पुणे – उन्हाच्या तीव्रतेत वाढ; शाळा सकाळच्या सत्रात

पुणे – उन्हाच्या तीव्रतेत वाढ होत चालल्याने जिल्हा परिषदेच्या शाळा सकाळच्या सत्रातच भरविण्यात येऊ लागल्या आहेत. यामुळे विद्यार्थी व शिक्षकांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.

प्राथमिक शाळांच्या वेळा व सुट्ट्या त्या त्या ठिकाणच्या हवामानानुसार, शेतीच्या हंगामानुसार आणि विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार देण्यात याव्यात याबाबत राज्य शासनाकडून स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीमध्ये 1 एप्रिलपासून शाळा सकाळच्या सत्रात भरविण्याबाबतचा ठराव मंजूर करण्यात आला आहे.

शासनाकडून जाहीर करण्यात आलेली दुष्काळ सदृश परिस्थिती, वाढता उन्हाळा यामुळे दरवर्षी प्रमाणे यंदाही एप्रिलच्या पूर्ण महिन्यात शाळा या सकाळच्या सत्रात भरविण्याबाबत विविध संघटनांकडूनही मागणी करण्यात आली होती. त्याची दखल घेऊन ती पूर्ण करण्यात आली आहे. सकाळच्या सत्रासाठी सकाळी 7 ते 11.15 तर दुपारच्या सत्रात 11.30 ते 3.30 याप्रमाणे शाळांच्या वेळा निश्‍चित केल्या आहेत, असे प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी सुनील कुऱ्हाडे यांनी स्पष्ट केले.

शाळांमध्ये समान सुसूत्रता आणण्याचा प्रयत्न
जिल्ह्यातील काही शाळा या दोन सत्रांत भरत आहेत. या शाळांमध्ये समान सुसूत्रता आणण्यात येत आहे. ज्या शाळांचे वर्ग पूर्ण वर्षभर सकाळच्या सत्रात भरत होते त्यांनी एप्रिलमध्ये दुपारच्या सत्रात वर्ग भरवावेत. जे वर्ग दुपारच्या सत्रात भरत होते त्यांनी सकाळच्या सत्रात भरवावेत. इयत्ता पहिली ते चौथीचे वर्ग हे मागील वर्षी जरी सकाळच्या सत्रात भरत असतील तर यावर्षी सुध्दा ते सकाळच्या सत्रातच भरवावेत, अशा सूचना कुऱ्हाडे यांनी सर्व पंचायत समितीच्या गट शिक्षणाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. या सूचनांची अंमलबजावणी तत्काळ सुरू करण्यात आली असून शाळांनी वेळाही बदलल्या आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.