इतर संतांच्या पालखी सोहळ्याबाबत दुजाभाव का?

संजय धोंडगे : नियोजनाची बैठक मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयात घेण्याची मागणी

आळंदी- संत ज्ञानेश्‍वर, संत तुकाराम व संत सोपानकाकांच्या पालखी सोहळ्यासाठी ज्या सुविधा दिल्या जातात त्या इतर संतांच्या पालखी सोहळ्याला का दिला जात नाही? इतर संतांच्या पालखीबाबत का दुजाभाव केला जातो? तरी राज्यातून आषाढी वारीसाठी पंढरीस येणाऱ्या पालखी सोहळ्याच्या नियोजनाची बैठक मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयात घ्यावी, अशी मागणी श्री संत निवृत्तीनाथ महाराज संस्थांचे अध्यक्ष हभप संजय धोंडगे यांनी केली आहे.

यंदा आषाढी वारी 12 जुलै रोजी आहे. या वारीसाठी संत मुक्‍ताबाईंचा पालखी सोहळा दि. 7 जून रोजी श्रीक्षेत्र मुक्‍ताईनगर येथून, संत गजानन महाराजांचा पालखी सोहळा दि. 8 जून रोजी श्रीक्षेत्र शेगावहून, संत निवृत्तीनाथ महाराजांचा पालखी सोहळा दि. 16 जून रोजी श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्‍वरहून, संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा दि. 24 जून रोजी श्रीक्षेत्र देहूहून, संत एकनाथ महाराजांचा पालखी सोहळा दि. 24 जून रोजी श्रीक्षेत्र पैठणहून, संत ज्ञानेश्‍वर महाराजांचा पालखी सोहळा दि. 25 जून रोजी श्रीक्षेत्र आळंदीहून तर संत सोपानकाकांचा पालखी सोहळा दि. 30 जून रोजी श्रीक्षेत्र सासवडहून प्रस्थान ठेवणार आहेत.
संत ज्ञानेश्‍वर, संत तुकाराम व संत सोपानकाका यांच्या पालखी सोहळ्याच्या नियोजनाची बैठक पुणे येथे विधानभवनमध्ये होते तर राज्यातील इतर पालखी सोहळ्यांकडे मात्र शासनाचे दुर्लक्ष होते. पंढरपूर येथे आषाढी वारीच्या पूर्वी सोलापुरचे पालकमंत्री बैठक घेतात; परंतु त्यामध्ये राज्यातील पालखी सोहळ्यांच्या नियोजनापेक्षा स्थानिक प्रश्‍नांकडेच अधिक लक्ष दिले जाते. त्यामुळे राज्यातील पालखी सोहळ्यांच्या मूलभूत प्रश्‍नांकडे मात्र दुर्लक्ष होते.

आषाढी वारीसाठी येणाऱ्या या पालखी सोहळ्यांसमोर वीज, पाणी, रस्ते, आरोग्य, सुरक्षा, गॅस, रॉकेल व पंढरपूर येथे आल्यानंतर मिळणारे तुटपुंजे दर्शन पास या सर्व अडचणी असतात. या अडचणीकडे शासनाचे नेहमीच दुर्लक्ष होते. संत ज्ञानेश्‍वर, संत तुकाराम व संत सोपानकाकांच्या पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी जिल्हा सिमेवर प्रशासन सज्ज असते. सर्व सुविधा शासन पुरविते मग इतर संतांच्या बाबतीतच असा दुजाभाव का ? या सुविधा राज्यातील इतर पालखी सोहळ्यांनाही मिळाल्या पाहिजेत, यासाठी राज्यातील पालखी मार्गावरील जिल्हा प्रशासनाची व पालखी सोहळा प्रमुखांची बैठक मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयात घ्यावी, अशी मागणी धोंडगे यांनी केली आहे.

  • “त्या’ सुविधा इतर पालखी सोहळ्यांनाही मिळावी
    दिवसेंदिवस पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. भागवत धर्माचा प्रचार व प्रसार मोठ्या प्रमाणात वाढु लागला आहे. मोठ्या प्रमाणात सुशिक्षीत समाजही सोहळ्यात येवू लागला आहे. त्यामुळे मुक्‍कामाच्या जागाही कमी पडू लागल्या आहेत. संत ज्ञानदेव, संत तुकाराम व संत सोपानकाका यांच्या पालखी सोहळ्याला ज्याप्रमाणे सुविधा दिल्या जातात तशा सुविधा राज्यातील इतर पालखी सोहळ्यांना मिळावी अशी मागणी धोंडगे यांनी केली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.