आमदार पाचर्णे, प्रशासनाचा नियोजनशून्य कारभार

माजी आमदार पवार यांचा आरोप : शिरूर तालुका दुष्काळाच्या खाईत लोटला

शिरूर- शिरूर तालुक्‍याला लाभदायी ठरलेली धरणे 100 टक्‍के भरली. मात्र, आमदार बाबूराव पाचर्णे व प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभाराममुळे तालुक्‍याला दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. एसी गाडीच्या काचा खाली करून दुष्काळग्रस्त गावांचा फेरफटका मारून पाहणी केल्यावर आमदारांना दुष्काळाचे वास्तव समजेल, असा टोला माजी आमदार ऍड. अशोक पवार यांनी आमदार बाबुराव पाचर्णे यांना लगावला.

राज्यात दुष्काळी परिस्थीती असताना शिरूर-हवेली मतदारसंघात मात्र, दुष्काळाची दाहकता कमी असल्याचे पाचर्णे म्हणाले होते. याचा समाचार घेताना माजी आमदार ऍड. पवार म्हणाले, माझ्या काळात धरणे 200 टक्‍के भरत नव्हती. एक वेळेस चासकमान 80 टक्‍के भरलेले असताना मी इनामगावच्या चारा छावणीला नियोजनपूर्वक पाणी मिळवून दिले होते. मांडवगणला तीन दिवसांत पाणी पोहोचणार होते. कुठे गेले ते तीन दिवस, हेच का तुमचे नियोजन? कुकडी कॅनालमधून नदीत सोडलेलेचे पाणी आमदार पाचर्णे यांनी आपल्या स्वतःच्या पर्यटन केंद्रापर्यंत व कृष्णामाईपर्यंत नेले. तेच पाणी आणखी दोन दिवस सुरू ठेवले असते तर निमोणे व शिंदोडीलाही फायदा झाला असता; परंतु आमदार पाचर्णे यांना तालुक्‍याचे काही देणे-घेणेनाही, असे अशोक पवार यांनी सांगितले.

आमदार बाबूराव पाचर्णे यांनी माजी आमदार पवार यांच्या नेतृत्वाखालील भीमा नदीपात्रात केलेल्या आंदोलनावर टीका केली होती त्यावर माजी आमदार अशोक पवार यांनी चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले की, आम्हाला पाण्यावरून राजकारण करायचे नाही. मात्र, पावसाळ्यात जेव्हा भरपूर पाणी होते. तेव्हा सत्ताधारी म्हणून त्याचवेळी तुम्ही पाण्याचे नियोजन का नाही केले? तुमच्या हट्टवादी पणामुळे व पाण्याच्या नियोजनाशून्य कारभारामुळे शेतकऱ्यांची मोठी हानी झाली असून चासकमान धरण पूर्ण भरले असताना पाण्याचे नियोजन पूर्ण बिघडवले. यामुळे पिंपळे जगताप, वाजेवाडी परिसरात कीती नुकसान झाले ते आमदारांनी पाहावे.पिण्यासाठी व होईना, पण पाणी शेवटच्या टोकापर्यंत सोडणे गरजेचे असताना आंबळेच्या पुढे पाणी गेले नाही.

  • … मात्र पाचर्णे यांचा पाणी सोडण्याच हट्ट
    रब्बीच्या वेळेस झालेल्या कालवा समितीच्या बैठकीत झालेल्या चर्चेवेळी विहिरींना भरपूर पाणी असल्याने आता रब्बीचे आवर्तन सोडू नका हेच पाणी उन्हाळी आवर्तनासाठी राखून ठेवा. असा विषय मी मांडला होता. मात्र, तालुक्‍यात ज्वारीची पिके जास्त असल्याने आमदार पाचर्णे यांनी पाणी सोडण्याचा हट्ट धरला. पुरंदर उपसा योजना कार्यान्वित होण्याआधी शेतकऱ्यांनी बारमाही परवानगी मिळवली होती. ही योजना आठमाही आहे. मग ज्यांनी बारमाही परवानगी मिळवली त्यांचा विचार करणार आहात की नाही? असा सवालही पवार यांनी उपस्थित केला आहे.
  • तहसीलदारांना निवेदन
    शिरूर तालुक्‍यात पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या पिण्याचा पाण्याचाप्रश्‍न गंभीर झाला असून औद्योगिक कारणासाठी देणारे पाणी बंद करावे व हे पाणी फक्‍त पिण्यासाठी व जनावरांसाठी देण्यात यावे, अशी मागणी माजी आमदार अशोक पवार यांनी निवेदनाद्वारे तहसीलदार गुरू बिराजदार यांच्याकडे केली आहे.
You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.