आदिवासी भागात भात लागवडीची धामधूम

पावसाने दिला बळीराजाला दिलासा : शेती कामांसाठी मजुरांची कमतरता

डिंभे- आंबेगाव तालुक्‍याच्या आदिवासी भागात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे भातकाचरे भरून वाहत आहेत. सध्या भात लागवडीची धामधूम सुरू असून त्यासाठी आदिवासी शेतकऱ्यांचे हात सरसावले आहेत. गेल्या चार-पाच दिवसांपासून या भागात पावसाने चांगलीच हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे.

आंबेगाव तालुक्‍याचा पश्‍चिम पट्टा हा सह्याद्री पर्वत रांगांनी वेढला असून तालुक्‍यात एकूण 5500 हेक्‍टर एवढे एकूण भातक्षेत्र आहे. या ठिकाणी पडणाऱ्या पावसावर येथील आदिवासी बांधव आपली रोजीरोटी भरण्यासाठी पावसाची प्रतीक्षा करतात. डोंगर उतारवर असणाऱ्या शेतात भात पिकाच्या रोपांची लागवड करतात. सध्या पावसाचा जोर असल्याने लावणीच्या कामांना विलंब होऊ नये, यासाठी येथील शेतकरी प्लॅस्टिक कागद, पोते, इरले-घोंगड्याचा वापर करून भात लावणीची कामे करताना दिसत आहेत. सतत पडणाऱ्या पावसामुळे आंबेगाव तालुक्‍यातील शेतकऱ्यांचा पाणी प्रश्न मिटला असून शेती पिकांना याचा मोठा फायदा होणार आहे.

पावसाने ओढ्या-नाल्यांना पुन्हा पाणी वाहू लागले आहे. भूगर्भातील पाणीपातळी वाढण्यास त्यामुळे मदत होणार आहे. वाढत्या औद्योगिकीकरणामुळे भातलागवडीसाठी मजूरच मिळत नाहीत. काही गावांमध्ये एकमेकांमध्ये अदलाबदली करून भातलागवड सुरू केली आहे. अनेक गावातील शेतकरी सध्या पारंपरिक पद्धत सोडून चारसूत्री भातलागवडीकडे वळलेला दिसत आहे. तसेच आधुनिक चारसुत्री पद्धतीचा अवलंब केला जात आहे.

आदिवासी भागात आकाश अंधारून येऊन सूर्यदर्शन फारसे होत नसले तरी पावसाने पूर्णपणे उघडीप दिली नसल्याने आदिवासी बांधवांनी मोकळा श्वास टाकला आहे. दमदार पावसाने शेतात पाणी साचले आहे. अनेक ठिकाणी सखल भागात पाण्याची तळी साचलेली दिसतात. आदिवासी भागात भात पिके शेतात डोलू लागली आहेत. खरीप पिकांना याचा फायदा होणार आहे.

तालुक्‍याचा पश्‍चिम भाग तसा निसर्गसौंदर्याने नटलेला परिसर आहे. सर्व परिसर हा सह्याद्रीच्या पर्वतरांगांचा प्रदेश असल्याने पावसाळा सुरू होताच या भागात लहान-मोठे धबधबे सुरू होतात. एरवी उन्हाळ्यामध्ये सर्वत्र रखरखीत दिसणारा प्रदेश पावसाळ्यामध्ये हिरवाईची झालर पांघरतो.

  • भात पिके आले होते धोक्‍यात

आंबेगाव तालुक्‍यातील पश्‍चिम पट्यातील भात पीक अक्षरश: धोक्‍यात आले होते. ठिकठिकाणी उगवलेली भाताची रोपे पावसाअभावी पिवळी पडत चालली होती. जर वेळेवर पाऊस नसता पडला तर भातपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असते. सध्या पावसाने पिकांना जीवदान मिळाले असून भात पीक तरारून आले आहेत. बळीराजाला वरुणराजने चांगली साथ दिल्यामुळे भातरोपे जोमात आली आहेत. त्यामुळे शेतकरी राजा सुखावला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)