युनियन क्‍लबच्या वादाला पुन्हा फोडणी

चौपाटी स्थलांतराचे भूत पुन्हा विक्रेत्यांच्या मानगुटीवर

सातारा –
भवानी पेठेतील युनियन क्‍लबच्या पिछाडीला असणाऱ्या 44 गुंठे जागेमध्ये चौपाटी हलवण्याच्या हालचालींनी लोकसभा निवडणुकांनंतर पुन्हा डोके वर काढले आहे. बुधवारी पुन्हा पालिकेत कमराबंद चर्चा झाल्याची बातमी थेट चौपाटीवर गेल्याने पुन्हा अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यामुळे शमलेल्या वादाला पुन्हा हवा मिळाली आहे.

सि. स. नं. 8 येथील जागा पालिकेच्या ताब्यात नसताना तेथे परस्पर चौपाटी हलवण्यच्या विषयावर युनियन क्‍लबच्या मंडळीनी नाके मुरडली आहेत. स्थायी समितीच्या सभेत सदस्यांनी डोकी गहाण पडल्याप्रमाणे तुघलकी निर्णय घेतल्याप्रमाणे चौपाटी गांधी मैदानावरून भवानी पेठेतील भाजी मंडईच्या पिछाडीला हलवण्याच्या निर्णयावर वाद सुरू झाला होता. मात्र लोकसभा निवडणुकांनी विशेषतः गांधी मैदानांवरील सभांनी चौपाटीचा अंत बधितला होता आता पुन्हा राजकीय दृष्ट्या सैलावलेल्या नगरसेवकांनी बंद कमरा खलबते सुरू केल्याने त्याची चर्चा थेट चौपाटीवर पोहचली आहे. चौपाटीचे स्थलांतर या विषयामागचा राजकीय अजेंडा आणि त्यामागचे इंटरेस्ट पुन्हा सक्रीय झाले आहेत.

अगदी थोडक्‍यात सांगायचे तर भाजपच्या वॉर्डात राष्ट्रवादीचा उघड उघड हस्तक्षेप सुरू झाला आहे. पालिकेने पहिल्या टप्प्यात तब्बल 44 गुंठे जागेवर चौपाटी सुरू करण्याच्या निर्णयाला वादग्रस्ततेची किनार निर्माण झाली आहे. जी जागाच स्वतःच्या ताब्यात नाही तेथे कशी चौपाटी हलविता येईल हा खरा मूळ वादाचा मुद्दा आहे. तेहतीस वर्षापूर्वी सत्ताधाऱ्यांना हाताशी धरून साताऱ्यातील काही लाडावलेल्या मंडळीनी एक ट्रस्टचे नाव पुढे केले आणि ब्रिटिशकालीन कलबचे संदर्भ देऊन ती जागा आपल्याच ताब्यात ठेवण्याचा चमत्कार घडवला. तब्बल तीन दशकाहून अधिक काळ ही जागा युनियन क्‍लब च्या ताब्यात ही 44 गुंठे जागा असताना तेंव्हा पालिकेला कधीच या जागेची आठवण आली नाही.

स्थावर जिंदगी विभागाने सुध्दा कोटयवधी रुपयांचे बाजारमूल्य असलेल्या या जागेकडे कधीच लक्ष दिले नाही. तत्कालीन लेखापालांच्या राजकीय दबावामुळे त्यातल्या त्यात ते खासदार उदयनराजे भोसले यांचे समर्थक असल्यामुळे कधीच कोणी ब्र उच्चारला नाही. मात्र राजमाता कल्पनाराजे भोसले यांनी स्वच्छ सुंदर राजवाड्याचा आग्रह धरल्यानंतर येथील चौपाटीला हलवण्याच्या निमित्ताने पालिकेने पुन्हा भवानी पेठेतील 44 गुंठे जागेवर आपला हक्क सांगितला आहे. त्यामुळे युनियन क्‍लब व पालिका यांच्यामध्ये आता वादाची भांडी वाजण्यास सुरवात होणार आहे.

येथील भाजपच्या नगरसेविका सिध्दी पवार (वॉर्ड क्र. 17) यांनी या जागेला पालिकेने तातडीने ताब्यात घेण्याची मागणी पालिकेकडे करून येथे आरक्षणानुसार उद्यान विकसित करण्यात यावे असा प्रस्ताव देऊन वर्ष उलटले मात्र आरक्षण विकसनात श्रेयवाद रंगण्याच्या भीतीने हा प्रस्ताव फाईलबंद ठेवण्यातच पालिकेने धन्यता मांडली. या जागेची वादग्रस्तता आणि त्यातला राजकीय दबाव यामुळेच स्वतःच मालक असलेली सातारा पालिका कारण नसताना युनियन क्‍लबच्या दारात टाचा घासणार अशी परिस्थिती आहे.

माजी उपनगराध्यक्ष जयेंद्र चव्हाण यांनी सुध्दा या जागेमध्ये नाना नानी पार्क विकसनाचा प्रस्ताव देऊन येथील ओढयावर पूल बांधला होता. मात्र युनियन क्‍लबने तो रस्ता पत्रा लावून तातडीने बंद केला होता. या क्‍लबमध्ये साताऱ्यातील काही रिकामटेकड्या मंडळींचे काय उद्योग चालतात हे समस्त सातारकरांना माहीत आहे. जर जागाच ताब्यात नाही तर चौपाटी कशी हलवणार? आणि चौपाटीवरील विक्रेत्यांना मुळात ही जागा मान्य नसल्याचे सांगितले जात आहे. या गोष्टींची गुंतागुंत आर्थिक लाभ व श्रेयवादात असल्याने सत्ताधारी काय विरोधक काय कोणीच या प्रश्‍नाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करत नाहीत ही खरी शोकांतिका आहे.

चौपाटी जाणार तरी कोठे ?

साताऱ्याचे सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांच्या आंदोलनामुळे गांधी मैदानावरची चौपाटी हलवण्याच्या कामाने गती घेतली आहे. सातारकरांना चौपाटी सोयीच्या ठिकाणी हवी आहे. भवानी पेठेतील जागा वादग्रस्त ठरल्यास चौपाटीसाठी दुसरी जागा शोधावी लागणार आहे. चौपाटीवर चायनीजच्या 90 ते 110 गाड्या आहेत. ते पाच गुंठे जागेत आरामात मावतात. त्यामुळे चौपाटीसाठी पर्यायी जागा शोधण्याची वेळ पुन्हा येऊ शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)