आता एकच चर्चा, लीड किती?

सातारा – जिल्ह्यातील माढा आणि साताऱ्याची निवडणूक पार पडल्यानंतर आता लीड किती? एवढीच चर्चा सर्वत्र होताना दिसत आहे. त्याचबरोबर उमेदवार समर्थकांमध्ये पैजा ही लागयला सुरुवात झाली आहे आणि विशेषत: सोशल मीडियावर दावे-प्रतिदाव्यांनी धुमाकुळ घातला आहे. हे सर्व सध्या होत असताना मध्यमवर्गीय नागरिक व नेटीझन्स चर्चांपासून अलिप्त राहणे उचित समजत आहेत. मात्र, त्यांना देखील 23 मे निकालाचा दिवस उजाडण्याची उत्कंठा लागली असल्याचे ते खासगीत सांगत आहेत.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा.शरद पवार यांनी माढा मतदारसंघातून लढण्याची घोषणा केली आणि तेव्हापासून मतदारसंघ देशाच्या मीडियामध्ये चर्चेत आला. त्याचबरोबर साताऱ्यात देखील खा. उदयनराजेंच्या अनोख्या स्टाईलमुळे मतदारसंघ अगोदरच चर्चेत होता. परंतु खा. उदयनराजेंच्या विरोधात यंदा युतीने पहिल्यांदाच तगडा उमेदवार नरेंद्र पाटील यांच्या रूपाने उतरविला आणि प्रचारा दरम्यान झालेल्या आरोप-प्रत्यारोपांमुळे साताऱ्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले. त्यामुळे स्वाभाविकच राष्ट्रवादी अन युतीचे कार्यकर्ते विशेषत: सोशल मीडियावर भिडताना दिसून आले. त्याचप्रमाणे माढा मतदारसंघातून पवारांनी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला. अकलूजचे मोहिते-पाटील भाजपमध्ये गेले. तर फलटणचे रणजितसिंह ना. निंबाळकर यांनी कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाला दूर सारत थेट भाजपची उमेदवारी स्विकारली. तर दुसऱ्या बाजूला भाजपच्या पाठबळावर सोलापूर जिल्हा परिषदचे अध्यक्ष संजय शिंदे यांनी राष्ट्रवादीची उमेदवारी स्विकारली.

निंबाळकर व शिंदे यांनी अवघ्या तीस दिवसात माढा लोकसभा मतदारसंघ पिंजून काढला. शिंदेंच्या बाजूने फलटणचे रामराजे ना. निंबाळकर, माणमधून प्रभाकर देशमुख, करमाळ्यातून रश्‍मी बागल, सांगोल्यातून आ. गणपतराव देशमुख तर माळशिरसमधून माने गट आणि माढ्यातून ज्येष्ठ बंधू आ. बबनराव शिंदे यांची साथ लाभली. तर रणजितसिंह ना. निंबाळकर यांना अकलूजचे मोहिते-पाटील, माणमधून आ.जयकुमार गोरे, शेखर गोरे, अनिल देसाई, माजी आमदार डॉ.दिलीप येळगावकर, सांगोल्यातून माजी आमदार शहाजीबापू पाटील, करमाळ्यातून आ. नारायण पाटील यांची साथ लाभली. त्यामुळे दोन्ही उमेदवारांना प्रचारासाठी फारसे कष्ट घ्यावे लागले नाहीत. परंतु निवडणुकीच्या निमित्ताने दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते मात्र आमने-सामने येताना दिसून आले.

आता निवडणूक झाल्यानंतर तर सातारा आणि माढा दोन्ही मतदारसंघातील कायकर्ते सोशल मीडियावर आपलाच उमेदवार निवडून येणार असा दावा करताना दिसून येत आहेत. एवढेच नव्हे तर कितीच्या लीडने येणार, या विषयावर दावे-प्रतिदावे केले जात आहेत. विषय फक्त एवढ्यावर थांबत नाही तर पैजा ही लागायला सुरुवात झाली आहे. पैजा प्रामुख्याने पैशासह, जेवणावळीवर लावल्या जात आहेत.

पैजा लागायला सुरुवात : सोशल मीडियावर दावे – प्रतिदावे

साताऱ्यात 11 लाखांच्या तर माढ्यात 12 लाखांच्यावर मतदान झाले आहे. त्यामुळे आपला उमेदवार लाखांच्या फरकानेच निवडून येणार असा दावा कार्यकर्ते करत आहेत. त्यामुळे पैज नेमकी कोण जिंकणार आणि जेवणावळीचा खर्च कोणाला उचलायला लागणार हे 23 मे रोजी स्पष्ट होणार आहे. तोपर्यंत आणखी 29 दिवस आणखी पैजा लागतील हे निश्‍चित आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.