विज्ञानविश्‍व: मरिआना ट्रेंचच्या तळाशी

डॉ. मेघश्री दळवी

पॅसिफिक महासागरातली मरिआना ट्रेंच म्हणजे जगातले सर्वात खोल ठिकाण. हिमालयाच्या उंचीलाही मागे टाकील इतकी खोली. हिमालयातल्या पर्वतरांगांवर चढाई करताना कमी ऑक्‍सिजनचा सामना करावा लागतो, तर मरिआना ट्रेंच इतक्‍या खोल जाताना पाण्याचा प्रचंड दाब सहन करावा लागतो. सोबत इतर अनेक अडचणी उभ्या असतात. म्हणूनच बहुधा गिर्यारोहक खूप असले तरी मरिआना ट्रेंचमध्ये जाण्याचे धाडस आजपावेतो केवळ तीनजणांनी केलेले होते. 1960 मध्ये डॉन वॉल्श आणि जॅक पिकार्ड हे महासागरांचा अभ्यास करणारे शास्त्रज्ञ, आणि त्यानंतर 2012 मध्ये हॉलीवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक जेम्स कॅमेरॉन. आता त्याच्यात आणखी एका नव्या साहसवीराची भर पडली आहे, व्हिक्‍टर वेस्कोवो. याआधी हा अचाट अवलिया हिंदी महासागरातल्या सर्वात खोल जागी, जावा ट्रेंचला जाऊन आलेला आहे. इतरत्रही खोल समुद्रात डायव्हिंग करणे ही त्याची आवड आहे आणि आता त्याच्या नावावर पुन्हा हा नवा विक्रम आला आहे. कारण 35 हजार 849 फूट इतक्‍या खोलवर गेलेला व्हिक्‍टर हा पहिलाच. त्याआधी जेम्स कॅमेरॉन 35 हजार 787 फुटावर पोहोचला होता.

पूर्ण काळोख, समुद्रसपाटीवर असतो त्याच्या हजारपट पाण्याचा दाब, अत्यंत थंडगार पाणी, आणि त्यातच ज्वालामुखी आणि तीनशे अंश सेल्शियस इतक्‍या प्रखर तापमानाचे उष्ण आम्लाचे झोत. मरिआना ट्रेंच अतिशय विचित्र आणि अद्‌भुत आहे. पण तिथल्या तऱ्हेतऱ्हेच्या समुद्री जीवांचा अभ्यास करण्यासाठी विशेष प्रकारची पाणबुडी घेऊन हे साहसी वीर तिथे जातात.

ही पाणबुडी म्हणजे एका माणसाला जेमतेम जागा होईल इतकी छोटी, पण अतिशय जाड भिंतीची असते. सावकाश आणि काटेकोर नियंत्रण करत या डीप सबमर्जन्स व्हेईकलला खोल खोल नेण्यात येते. तिथवर पोचायला या पाणबुडीला सुमारे चार तास लागले. या प्रवासात व्हिक्‍टर खिडकीतून ते अनोखे जग बघत होता. पूर्ण शांतता, चित्रविचित्र समुद्री जीव, पृथ्वीतलावर कोणीही न पाहिलेल्या दृश्‍याचा तो एकमेव साक्षीदार.

तिथे व्हिडीओ घेऊन झाल्यावर आणि तिथले काही नमुने गोळा केल्यावर ही पाणबुडी पुन्हा एकदा हळूहळू वर परत आली. पाण्याच्या दाबात एकदम फरक झाला तर जाड भिंतींना तडा जाऊ शकतो, म्हणून खाली जाताना आणि वर येताना या पाणबुडीचा वेग अचूकपणे संथ ठेवावा लागतो.

जगातील सर्वाधिक उंचीचे ठिकाण माऊंट एव्हरेस्ट, सर्वाधिक खोलीची मरिआना ट्रेंच, यानंतर व्हिक्‍टर वेस्कोवोला वेध लागेल आहेत अवकाशाचे. एकदा तरी अवकाशातून पृथ्वीप्रदक्षिणा करत आपल्या निळ्याशार ग्रहाचे दर्शन घेण्याचे त्याचे स्वप्न आहे.

जाता जाता इतक्‍या खोल मरिआना ट्रेंचच्या तळाशी ही अद्‌भुत स्वारी करताना व्हिक्‍टरला तिथे काय आढळले असेल? एक त्रिकोणी आकाराचा कसल्याशा डब्याचा तुकडा. तो धातूचा किंवा प्लॅस्टिकचा असावा असा व्हिक्‍टरचा कयास आहे. तो नैसर्गिक नव्हता, नक्‍कीच मानवनिर्मित होता. आपण निर्माण केलेला कचरा महासागरातल्या सर्वात खोल बिंदूपाशी पोचलाय हे गालबोट या यशस्वी मोहिमेला लागणे जरुरी होते का?

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)