गेल्या 4 वर्षांत चौपट वाढ कर भरण्यासाठी “ऑनलाइन’ पसंती पॉझिटीव्ह
सुनील राऊत
पुणे – महापालिकेचा मिळकतकर ऑनलाइन भरण्यास पुणेकरांकडून पसंती दर्शविली जात आहे. गेल्या चार वर्षांत हे प्रमाण चारपटींनी वाढले आहे. विशेष म्हणजे हा करभरणा ऑनलाइन करताना नेटबॅंकिंग तसेच डेबिट आणि क्रेडिट कार्डचा वापर सर्वाधिक केला जात असून गेल्या वर्षभरात यूपीआय आणि गुगल-पेचा वापर कर भरण्यासाठी केला जात असल्याचे महापालिकेच्या आकडेवारीवरून समोर आले आहे.
2015-16 या आर्थिक वर्षात एकूण जमा मिळकतकरात 13 टक्के कर हा ऑनलाइन पद्धतीने भरण्यात आला होता. तर 2018-19 मध्ये हे प्रमाण तब्बल 33 टक्के झाले आहे तर, 2019-20 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या महिन्यात हे प्रमाण जवळपास 52 टक्के आहे. त्यामुळे दरवर्षी हे प्रमाण वाढतच असून येत्या काही वर्षांत 100 टक्के ऑनलाइन मिळकतकर संकलन करण्यासाठी महापालिकेकडून विशेष उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. महापालिकेकडून यावर्षी सुमारे 9 लाख 20 हजार मिळकतकरांच्या बिलांचे वाटप करण्यात आले आहे. 2015-16 या आर्थिक वर्षात पालिकेच्या तिजोरीत 1 हजार 80 कोटींचा कर जमा झाला होता. त्यात सुमारे 13 टक्के (160 कोटी) ऑनलाइन जमा झाले होते.
2016-17 मध्ये 1,201 यात 17 टक्के (209 कोटी) ऑनलाइनद्वारे, 2017-18 मध्ये 1 हजार 84 कोटींपैकी 32 टक्के (343 कोटी) ऑनलाइन स्वरूपात जमा झाले होते. तर 2018-19 मध्ये जमा झालेल्या एकूण 1 हजार 95 कोटी रु.करामध्ये सुमारे 33 टक्के ( 404 कोटी) ऑनलाइन जमा झाले होते. तर 1 एप्रिल 2019 पासून आजअखेर सुमारे 303 कोटी तिजोरीत जमा असून त्यातील 52 टक्के ( 159 कोटी) ऑनलाइनद्वारे जमा झालेले आहेत.
15 ऑनलाइन पर्याय
मिळकतकर भरण्यासाठी पुणे महापालिकेकडून जवळपास 14 ते 15 ऑनलाइन पर्याय उपलब्ध करून देण्यात आले असून हे सर्व सुरक्षीतरित्या सुरू आहेत. त्यामुळे एका क्लिकवर कर भरणे शक्य आहे. त्यामुळे नागरिकांना कर भरण्यासाठी रांगेत उभे राहावे लागत नाही. प्रामुख्याने आयटी कंपन्या, शासकीय कर्मचारी तसेच इंटरनेटचा मोठ्या प्रमाणात वापर करणाऱ्या मिळकतधारकांकडून ऑनलाइन कर भरण्यास प्राधान्य दिले जात आहे.
नेट बॅंकिंगला सर्वाधिक प्राधान्य
ऑनलाइन कर भरण्यात पुणेकरांकडून नेट बॅंकिंगला सर्वाधिक प्राधान्य दिले जात आहे. 2019-20 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या दीड महिन्यातील चित्र पाहता जो 52 टक्के मिळकतकर ऑनलाइनद्वारा जमा झाला आहे, त्यात 42 टक्के नेट बॅंकिंगचे प्रमाण आहे. तर अनुक्रमाने 23 आणि 22 टक्के प्रमाण डेबिट आणि क्रेडिटकार्डचे आहे. तर यूपीआय आणि गुगल-पे चा वापर करूनही 4 टक्के कर जमा झालेला आहे.