पुणे – अर्न्स्ट अँड यंग संघाने एसपीजे ग्रुप संघाचा पराभव करत येथे पार पडलेल्या सत्य प्रकाश जोशी ग्रुप यांच्या तर्फे 5व्या एसपीजे करंडक कॉर्पोरेट टी-20 क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
व्हेरॉक क्रिकेट मैदान व लेजेंड्स क्रिकेट अकादमी मौदान येथे पार पडलेल्या या स्पर्धेत विजेतेपदासाठीच्या लढतीत अर्न्स्ट अँड यंग संघाने एसपीजे ग्रुप संघाचा 25 धावांनी पराभव करत विजेतेपद पटकावले. पहिल्यांदा खेळताना इंद्रजीत उधानच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर अर्न्स्ट अँड यंग संघाने 20 षटकांत 5 बाद 158 धावा केल्या. यात इंद्रजीत उधानने 31 चेंडूत 50 तर अव्दैय शिंध्देने 33 चेंडूत 49 धावा करून संघाचा डाव भक्कम केला.
158 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आकाश जाधव, इंद्रजीत उधान व अव्दैय शिंदेच्या अचूक गोलंदाजीपुढे एसपीजे ग्रुप संघ 18.3 षटकांत सर्वबाद 133 धावांत गारद झाला. 31 चेंडूत 50 धावा व 18 धावांत 3 गडी बाद करणारा इंद्रजीत उधान सामनावीर ठरला.
स्पर्धेतील विजेत्या अर्न्स्ट अँड यंग संघाला करंडक व 50 हजार रुपये, तर उपविजेत्या एसपीजे ग्रुप संघाला करंडक व 30हजार रुपये अशी पारितोषिके देण्यात आली. याशिवाय मालिकावीर खेळाडूला करंडक व 10 हजार रुपये, सर्वोत्कृष्ट फलंदाज व गोलंदाज यांना प्रत्येकी 5 हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण संतोष जोशी व शितल शर्मा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी निरज जोशी, अनुज वैद्य व स्पर्धा संचालक अश्विन पन्हाळकर आदी मान्यवर उपस्थित होते.