लंडनमध्ये एमक्‍यूएमचे संस्थापक अल्ताफ हुसेन यांना अटक

पाकिस्तानविरोधी भाषणांबद्दल कारवाई

लंडन -पाकिस्तानमधील प्रमुख राजकीय पक्षांपैकी एक असणाऱ्या मुत्ताहिदा कौमी मुव्हमेंटचे (एमक्‍यूएम) संस्थापक अल्ताफ हुसेन यांना मंगळवारी लंडनमध्ये अटक करण्यात आली. पाकिस्तानविरोधी भाषणांबद्दल त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचे समजते.

पाकिस्तानविरोधात सातत्याने आक्रमक पवित्रा घेणाऱ्या 65 वर्षीय हुसेन यांच्या एमक्‍यूएमचा प्रभाव प्रामुख्याने त्या देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या कराचीत आहे. पाकिस्तानातून हद्दपार करण्यात आल्याने हुसेन यांनी काही वर्षांपूर्वी ब्रिटनकडे आश्रयाची विनंती केली. नंतर त्यांना ब्रिटीश नागरिकत्वही मिळाले. त्यानंतरही हुसेन यांनी पाकिस्तानविरोधी भूमिका कायम ठेवली.

प्रामुख्याने 2016 मध्ये त्यांनी केलेल्या एका भाषणामुळे त्यांना अटक करण्यात आल्याचे मानले जात आहे. त्या भाषणात हुसेन यांनी पाकिस्तानची लक्तरे वेशीवर टांगली. त्यांनी पाकिस्तानचा उल्लेख संपूर्ण जगासाठीचा कॅन्सर, जगासाठीची डोकेदुखी अशा शेलक्‍या शब्दांत केला. पाकिस्तान दहशतवादाचे केंद्रस्थान असल्याचेही त्यांनी म्हटले. त्या भाषणात हुसेन यांनी त्यांच्या समर्थकांना कायदा हातात घेण्याचे आवाहन केले.

त्यानंतर एमक्‍यूएमच्या कार्यकर्त्यांनी पाकिस्तानविरोधी घोषणा देत कराचीमध्ये एका प्रसारमाध्यमाच्या कार्यालयात तोडफोड केली. विरोधी भूमिकेमुळे पाकिस्तान हुसेन यांच्यावर दात खावून होते. त्यांच्या विरोधात पाकिस्तानात अनेक गुन्हेही दाखल आहेत. आता हुसेन यांना लंडनमध्ये स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी अटक केल्याने पाकिस्तानला गुदगुल्या होण्याची शक्‍यता आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)