इराणने युरेनियमच्या साठ्याची मर्यादा ओलांडली

तेहरान, (इराण) – इराणने 2015 च्या अणू करारानुसार मान्य केलेली समृद्ध युरेनियमच्या साठ्याची मर्यादा ओलांडली आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री मोहम्मद जावाद झरिफ यांनी आज ही माहिती दिली. इराणल अणू कराराद्वारे 300 किलोग्रॅम युरेनियमच्या साठ्याची मर्यादा घालून देण्यात आली होती. ही मर्यादा इराणने ओलांडली असून याबाबत इराणने आपला हेतू मे महिन्यातच स्पष्ट केला होता, असेही झरिफ यांनी सांगितले.

इराणबरोबरच्या अणू करारातून अमेरिकेने गेल्यावर्षीच माघार घेतली आणि इराणवर कठोर आर्थिक निर्बंधही घातले आहेत. इराणवर अनेक बाजूंनी दबाव आणण्याचा प्रयत्नही अमेरिकेकडून केला जात आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने 8 मे रोजी युरेनियम आणि पाण्याच्या साठ्यावरची मर्यादा झुगारून देण्याची घोषणा केली होती. यापुढे जर ब्रिटन, चीन, फ्रान्स, जर्मनी आणि रशिया या अणू करारातील अन्य भागीदारांनी निर्बंधांना मदत केली तर अण्वस्त्रांबाबतच्या अटी झुगारून देण्याचा इशाराही इराणने दिला होता.

अणू करार वाचवण्यच्या दृष्टीने “इन्स्टेक्‍स’ ही यंत्रणा शुक्रवारी कार्यन्वित करण्यात आली. त्यानुसार पहिला व्यवहार होत आहे, असे युरोपियन संघाकडून सांगण्यात आले. मात्र युरोपिय संघाचे प्रयत्न पुरेसे नाहीत. त्यामुळे इराणने पूर्वी घोषणा केल्याप्रमाणेच कृती करायचे ठरवले असल्याचे परराष्ट्र मंत्री जावाद झरिफ यांनी स्पष्ट केले. “इन्स्टेक्‍स’ ही केवळ युरोपिय संघाची बांधिलकी आहे. त्याची अजून अंमलबजावणी झालेली नाही, असेही ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)