पर्यावरणासंबंधीच्या उपाय योजना जागतिक दबावामुळे नाहीत – प्रकाश जावडेकर

नवी दिल्ली – पर्यावरणसंबंधिच्या भारताच्या उपाययोजना कुठल्याही जागतिक दबावामुळे नसून देशाच्या शाश्वत विकासाच्या दृष्टीने आम्ही स्वत:च त्या करत आहोत, असे केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटले आहे. जागतिक वाळवंटीकरण आणि दुष्काळ निवारण दिवसानिमित्त नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. “कॉप- 14′ म्हणजेच संबंधित देशांच्या परिषदेच्या 14 व्या सत्राचे यजमानपद भारताला मिळाले असून 29 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर 2019 दरम्यान ही परिषद होणार आहे, अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली.

जमिनीची झपाट्याने धूप होत असून देशातल्या 30 टक्के जमिनीचे त्यामुळे नुकसान झाले आहे. हे थांबवण्यासाठी भारत सर्वतोपरी प्रयत्न करण्यास कटिबद्ध आहे, असे त्यांनी सांगितले. शेती आणि शेत जमीन सुधारण्यासाठी सरकारने हाती घेतलेल्या विविध योजनांची माहिती त्यांनी दिली. वन जमिनींवर वनीकरण वाढवण्यासाठीच्या पथदर्शी योजनेचे उद्‌घाटनही जावडेकर यांच्या हस्ते झाले.

या “कॉप- 14′ परिषदेसाठी 197 देशातले 5 हजार प्रतिनिधी सहभागी होतील. यात विज्ञान, संशोधन क्षेत्रातले तज्ज्ञ, सरकारी प्रतिनिधी, खासगी क्षेत्र, आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी आणि माध्यम प्रतिनिधी उपस्थित असतील. वाळवंटीकरण, जमीन नापिक होणे आणि दुष्काळ अशा संकटांवर या परिषदेत उपाययोजना शोधल्या जातील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)