कलंदर : आला एकदाचा…

– उत्तम पिंगळे

प्रा. विसरभोळे : या… पावसाने काय तुमचा रस्ता एकदम बंदच केला की काय?
मी : होय सर केवढं पाणी? कसे चालायचे तेच समजत नव्हते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

विसरभोळे : महिनाभर पावसाची सर्वजण वाट पाहत होता ना? मग आला आता घ्या.
मी : बरोबर आहे, पण काय झाले महिन्याच्या शेवटच्या तीन दिवसांत एवढा पाऊस झाला आहे काही विचारू नका, सर्वांची तारांबळ उडाली.

विसरभोळे : हे बघा, जूनच्या पहिल्या आठवड्यात तसा पाऊस येतो म्हणजे, यायचा पण त्यात आता बदल होत आहे. पण म्हणून आपण आपली तयारी नको का करायला?
मी : बरोबर आहे, पण असा एकदम पाऊस पडेल असे वाटले नव्हते.

विसरभोळे : अरे वा! तुम्ही तुमची मनमानी करायची आणि पावसाने नाही हे कसे?
मी : म्हणजे?

विसरभोळे : आपण पाहताच की मानवाने आपल्या प्रगतीच्या नावाखाली निसर्गास रोखण्याचे ठरवलेले दिसते. सर्वत्र वृक्षतोड चालू आहे. महामार्ग व औद्योगीकरणाच्या नावाखाली असे भरमसाठ प्रमाणात होत आहे. कित्येक जंगली वनस्पतींपासून आयुर्वेदिक औषधे व उपयोगी वस्तू बनवण्याचे उद्योग करत असताना या वनस्पतींचे संवर्धन करण्याचे प्रयत्न कोण करतो ते सांगा?
मी : नाही, बरोबर आहे पण आता बघा आपल्याकडे प्लॅस्टिक बंदी झालेली आहे…

विसरभोळे : (थांबवत) मला सांगा की प्लॅस्टिक बंदी झाली म्हणून प्लॅस्टिक पिशव्या मिळत नाहीत का? कित्येक ठिकाणी सुरुवातीला कारवाई झाली, आता पुन्हा येरे माझ्या मागल्या.
मी : बरोबर आहे कारवाई होणे आवश्‍यकच.

विसरभोळे : मुंबईत सुरुवातीला पाऊस पडला की पाणी तुंबलेच म्हणून समजा. पहिला पाऊस पडला की नाले आपोआपच बऱ्यापैकी साफ होतील असे समजून मुद्दाम त्याला उशीर केला जातो, हा खरा प्रश्‍न आहे.
मी : कित्येक ठिकाणी कंपाउंडच्या भिंतीही पडल्या आहेत.

विसरभोळे : नाले तुंबले की सोसायटीच्या भितींच्या आड पाणी तुंबले जाते. आता त्या भिंती म्हणजे बंधारा किंवा धरण थोडेच आहे? मग पाण्याच्या दाबाने त्या पडतात. भ्रष्टाचाराने नाले तुंबल्यावर पाऊस अशा भिंती पाडतो असे म्हणून पावसाला दोष देता आणि नेते भिंती मतांसाठी मजबूत कशा होतील तेच पाहात असतात.
मी : बरोबर आहे सर, पण जास्त नुकसान गरिबांचेच होते ना?

विसरभोळे : तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, पण निसर्गाकडे गरीब श्रीमंत असा भेदभाव नाही. गरीब जात्यात आहे तर श्रीमंत सुपात आहे एवढेच. हे सर्व टाळण्यासाठी सर्वांनी निसर्गाचे संवर्धन केले पाहिजे. निसर्गाचा ऱ्हास म्हणजे मानवजात संपण्याची सुरुवात ठरणार आहे.
मी : बरोबर आहे सर, म्हणूनच निसर्ग संवर्धनाच्या कायद्याची सक्‍ती सद्यःस्थितीत करणे आवश्‍यक आहे. कारण सध्यातरी आपल्याला दंड, शिक्षा याच भाषा समजतात त्याला काय करणार?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)