पुणे – आंबेगाव येथील सीमाभिंत कोसळून सहा मजूर ठार झाल्याप्रकरणी पोलिसांनी सिंहगड इन्स्टिट्यूटच्या वेणूताई चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या व्यवस्थापनासह सहा जणांविरोधात मंगळवारी रात्री उशीरा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला.
याप्रकरणी सर्व्हे क्रमांक 10/10 आंबेगाव बुद्रुक येथील जागामालक, इमारत विकसक, ठेकेदार तसेच सिंहगड इन्स्टिट्यूटचे वेणूताई चव्हाण तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे व्यवस्थापक आणि बांधकाम विभागाचे कामकाज पाहणारे अधिकारी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक शक्तीसिंग खानविलकर यांनी यासंदर्भात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबेगाव बुद्रुक येथील सिंहगड इन्स्टिट्यूटच्या आवारात सीमाभिंतीला लागून असलेल्या जागेत बांधकाम व्यावसायिक, जागामालक, ठेकेदार यांच्याकडून काम सुरू होते. सीमाभिंतीजवळ बांधकाम मजुरांसाठी तात्पुरत्या स्वरुपात पत्र्याची घरे बांधण्यात आली होती. सिंहगड इन्स्टिट्यूच्या आवारातील सीमाभिंत सोमवारी रात्री मजुरांच्या घरावर कोसळली. या घटनेत सहा मजूर मृत्यूमुखी पडले होते. या प्रकरणी पोलिसांनी तपास करून संबंधितांविरोधात रात्री गुन्हा दाखल केला, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू पवार यांनी दिली.