उसवत चाललीय नात्यांची वीण…

कलंक – श्रीकांत देवळे

काळाबरोबर समाज बदलला आहे. माणसांच्या विचारांमध्येही फरक पडला आहे. परंपरांच्या नावाखाली लादलेल्या रुढीवादी विचारांचे जोखड फेकून देण्याचे धाडस अनेकांनी दाखविले आहे. या प्रक्रियेत समाजाला बऱ्यापैकी यश आल्याचे दिसूनही येत आहे; परंतु येथूनच नाती तुटायलाही सुरुवात झाली आहे. आधुनिकतेचा प्रभाव आता आपल्या नात्यांमधील दुराव्यामधून स्पष्ट दिसू लागला आहे. रोहित शेखर खून प्रकरणात हेच घडल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे.

बदलत्या सामाजिक पर्यावरणात आणि परिवर्तनशील जीवनात जसजशा अपेक्षा आणि आकांक्षा वाढत आहेत, तसतशी नात्यांची वीण कमकुवत होताना दिसत आहे. पवित्र मानली जाणारी नातीही दुरावत आहेत. वेगाने बदलणाऱ्या युगात, बदलत्या जीवनशैलीने नात्यांचा पाया हादरवून टाकला आहे. नात्यांच्या बाबतीत समाज कोणत्या दिशेने चालला आहे, असा प्रश्‍न दिल्ली येथे घडलेल्या एका घटनेने उपस्थित केला आहे. राजधानी दिल्लीत हायप्रोफाईल कुटुंबात घडलेल्या या घटनेत माजी मुख्यमंत्री नारायणदत्त तिवारी यांचा मुलगा रोहित शेखर तिवारी यांचा खून त्यांच्याच पत्नीने केल्याचे उघड झाले आहे. खुनानंतर या घटनेला वेगळाच रंग देण्याचा प्रयत्नही पत्नीने केला. परंतु स्वतः कायद्याची जाणकार आणि निष्णात वकील असलेली ही महिलासुद्धा कायद्याच्या कचाट्यातून सुटू शकली नाही. पोलिसांनी सतर्कता दाखविल्यामुळे अवघ्या दोन दिवसांत या घटनेचा पर्दाफाश झाला.

“स्त्री-पुरुषांच्या जोड्या स्वर्गातच तयार केल्या जातात,’ हे वाक्‍य पृथ्वीवर जेव्हा मानवजातीचा उदय झाला, तेव्हापासून म्हटले जात आहे. परंतु मानवजात या जोड्या तोडण्यातच धन्यता मानत आहे. साक्षात्‌ देवाने बनविलेल्या जोड्या तोडताना मानवाला कोणत्याही प्रकारची भीती वाटत नाही. पवित्र मानली जाणारी नाती कलियुगात लोभ आणि लालसा यामुळे उद्‌ध्वस्त होत आहेत. रोहित शेखर तिवारी हत्या प्रकरणात याच वास्तवाचा प्रत्यय आला आहे. पोलिसांच्या तपासादरम्यान त्यांच्या पत्नीने पोलिसांना सांगितले की, तिच्या पतीचे म्हणजे रोहितचे अन्य महिलांशी संबंध होते; परंतु कुटुंबातील अन्य सदस्यांच्या म्हणण्यानुसार, संपत्तीच्या लोभापायी ही हत्या करण्यात आली आहे. यातील वास्तव ईश्‍वरालाच ठाऊक… किंवा रोहित यांच्या पत्नीला! परंतु दोन कारणे पूर्वीपासूनच सामाजिक आणि वैवाहिक जीवन उद्‌ध्वस्त करण्यास कारणीभूत ठरली आहेत; ठरत आहेत. घरांचा पायाच या कारणांमुळे हादरत आहे. मोठमोठी साम्राज्येही या कारणांमुळे उद्‌ध्वस्त झाली आहेत.

समाजाची वीण नात्यांच्या इमारतीवरच अवलंबून असते; परंतु बदलत्या सामाजिक पर्यावरणाने हा पाया हादरवून टाकला आहे. रोहित शेखर यांची पत्नी अपूर्वा शुक्‍लाने पोलिसांच्या तपासात या घटनेची संपूर्ण माहिती देऊन समाजाला नात्यांविषयी मंथन करण्यास भाग पाडले आहे. लोक आपल्या माणसांपासूनच दूर का जाऊ लागले आहेत? एकमेकांच्या रक्ताची तहान त्यांना का लागत आहे? हा खरोखर चिंतेचा आणि चिंतनाचा विषय आहे. लग्न मोडण्याची टक्केवारी प्रेमविवाहांमध्ये सातत्याने वाढताना दिसत आहे. केवळ संशय आणि मालमत्तेची हाव यातून एका पत्नीने आपल्या पतीला मृत्यूच्या हवाली केले. पोलिसांना दिलेल्या कबुलीजबाबात पत्नीने आपल्या कृत्याविषयी जी संगतवार माहिती दिली, ती हादरवून टाकणारी आहे. तिने कशा प्रकारे रोहित यांना बेशुद्ध केले, नंतर उशीच्या साह्याने तिने रोहित यांचा चेहरा दाबून धरला… हे सर्व करताना उभयतांमधील नात्याचा जणू विसरच पडला होता. पवित्र मानले जाणारे नाते तिने एका क्षणात अपवित्र करून टाकले.

पोलिसांनी तपासात जो घटनाक्रम शोधून काढला, त्यानुसार पतीशी भांडण झाल्यावर पत्नी काही काळ विचार करत राहिली. आता आपण काय केले पाहिजे, हे तिच्या मनात होते. त्याच वेळी रोहित यांना बेशुद्ध करून ठार मारण्याची कल्पना तिच्या मनात आली. अपूर्वाने तसेच केले. दारूच्या नशेत चूर झालेल्या रोहित यांना अपूर्वाने अंमली पदार्थ देऊन पुढील कृत्य केले. या घटनेत रोहित यांच्या नाकातून आणि तोंडातून रक्तही वाहिले. अपूर्वाने हे रक्ताचे डाग साफ केले. या घटनेत रोहित यांचा घरगुती नोकर आणि वाहनचालक यांचाही हात असल्याचे पोलिसांकडून सांगितले जाते. अर्थात, या घटनेचे अन्य काही पैलू आहेत का, याचाही पोलीस विचार करीत आहेत. घटनेनंतर अपूर्वाने वारंवार जबाब बदलले. त्यामुळेच संशयाची सुई तिच्याभोवती फिरत राहिली. त्यानंतर ती जाळ्यात अडकण्यास वेळ लागला नाही. मग अपूर्वाने संपूर्ण घटना संगतवार सांगितली.

नात्यात अपेक्षांचे ओझे जेव्हा वाढते, तेव्हा नात्याची इमारत डळमळीत होऊ लागते. रोहित हत्या प्रकरणात जवळजवळ हेच पाहायला मिळाले. स्वर्गीय नारायणदत्त तिवारी यांच्या संपत्तीतील काही हिस्सा रोहित यांच्या पत्नीला तिच्या नावे करून हवा होता, असा आरोप रोहित यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. तसे करण्यास रोहित तयार नव्हते. यावरूनच या दोघांमध्ये भांडणे होत होती; परंतु घटनेदिवशी झालेल्या भांडणाचे कारण वेगळेच होते, असे पत्नी सांगते. त्या रात्री रोहित त्यांच्या एका मैत्रिणीसमवेत दारू पीत असताना आपण पाहिले, असे अपूर्वाचे म्हणणे आहे. तिच्या म्हणण्यानुसार, तिने रोहित यांना रोखण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांनी तिला मारहाण केली. परंतु रोहित यांचे कुटुंबीय अपूर्वाचा हा आरोप फेटाळून लावत आहेत. रोहित यांच्या भावाच्या म्हणण्यानुसार, आपल्या माहेरच्या मंडळींसाठी वेगळे घर बांधण्याच्या मुद्द्यावरूनही अपूर्वाचे रोहित यांच्याशी भांडण होत असे.

कारणे बरीच आहेत. तूर्तास घटनेचा पर्दाफाश झाला आहे. पोलिसांनी अपूर्वा यांच्या रक्ताचे नमुने आणि घटनास्थळी आढळलेल्या रक्ताचे नमुने घेऊन तसेच अपूर्वाचा जबाब घेऊन त्याआधारे पत्नीला मुख्य आरोपी केले आहे. घटनास्थळी मिळालेले सर्व पुरावे परीक्षणासाठी पाठविण्यात आले आहेत. पुरावे नष्ट करण्यासाठी अपूर्वाने आपला मोबाइलसुद्धा फॉरमॅट केला होता, हे उघड झाले आहे. ज्या खोलीत रोहित यांची हत्या झाली, त्या खोलीतील सीसीटीव्ही कॅमेरे नादुरुस्त असणेही रोहित यांची हत्या बाहेरील नव्हे तर घरातीलच कुणीतरी केली असावी, या संशयाला पुष्टी देणारे आहे. पोलिसांच्या संशयाच्या केंद्रस्थानी प्रथमपासूनच सर्वांत वरच्या स्थानी दुसरेतिसरे कुणी नव्हते, तर रोहित यांची पत्नी अपूर्वा हीच होती. अपूर्वाचे लग्न रोहित यांच्याबरोबर एक वर्षापूर्वीच झाले होते. सर्वोच्च न्यायालयात ती वकिली करते. घटनेच्या दिवशी रोहित यांच्या खोलीतून बाहेर पडणारी अपूर्वा हीच अखेरची व्यक्ती होती.

अर्थात, पोलिसांनी घटनेच्या सर्व पैलूंचा स्वतंत्रपणे अभ्यास केला. सुरुवातीला पोलिसांनी रोहित यांचा भाऊ सिद्धार्थ याच्यावरही संशय व्यक्त केला होता. कोट्यवधींच्या संपत्तीसाठी भावा-भावांमध्ये कुरबुरी असण्याची शक्‍यता होती; म्हणूनच पोलिसांनी ही शक्‍यताही नजरेआड केली नाही. घरात त्या दिवशी वाहनचालकासमवेत चार नोकरही होते. घरात त्या दिवशी बाहेरून कुणीच आले नव्हते; त्यामुळे या चौघांची भूमिकाही संशयास्पद मानून तपास करणे आवश्‍यक होते. थेट स्वरूपात नसला, तरी हत्येत त्यांचा अप्रत्यक्ष किंवा मदतीच्या स्वरूपात सहभाग असणे नाकारता येत नव्हते. आता हे प्रकरण न्यायप्रविष्ट झाले आहे. अंतिम निकाल येईपर्यंत प्रतीक्षा करावी लागेल. परंतु नात्यात जो दगाफटका या प्रकरणात प्रथमदर्शनी दिसून आला, तो समाजाला विचार करायला लावणारा ठरला आहे.

आज आपल्या देशात नात्यांच्या बाबतीत जे अधःपतन वेगाने होताना दिसते आहे, तेवढे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आजतागायत पाहायला मिळाले नव्हते. नात्यांच्या ज्या बंधनांनी समाज एकत्र बांधलेला आहे, ते धागे विस्कटू लागले आहेत. रक्षाबंधनातून अतूट बनलेले बहीण-भावाचे नातेही आजकाल संपत्तीसाठी डळमळीत होऊ लागले आहे. गरू-शिष्य, मामा-भाची, काका-पुतणी अशी नातीही वासनांध लोकांच्या दुष्कृत्यांमुळे कलंकित झाली आहेत. देशात बलात्काराची एकही घटना ऐकायला मिळाली नाही, असा एकही दिवस जात नाही. बलात्कार, सामूहिक बलात्कार या बातम्या आता माध्यमांमध्ये प्रामुख्याने दिसतात. काळाबरोबर समाज बदलला आहे. माणसांच्या विचारांमध्येही फरक पडला आहे. परंपरांच्या नावाखाली लादलेल्या रुढीवादी विचारांचे जोखड फेकून देण्याचे धाडस अनेकांनी दाखविले आहे. या प्रक्रियेत समाजाला बऱ्यापैकी यश आल्याचे दिसूनही येत आहे. परंतु येथूनच नाती तुटायलाही सुरुवात झाली आहे. आधुनिकतेचा प्रभाव आता आपल्या नात्यांमधील दुराव्यामधून स्पष्ट दिसू लागला आहे. रोहित शेखर खून प्रकरणात हेच घडल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)