पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून एक, तर दोन अपक्ष उमेदवार
बारामती- नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक 5 मधील पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी तीन उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. राष्ट्रवादीकडून बाळासाहेब सातव यांच्या पत्नी संगीता सातव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर शुभम मोरे व अनिल मोरे या दोन उमेदवारांनी अपक्ष अर्ज दाखल केले आहेत.
बारामती नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक पाचमधील नगरसेवक बाळासाहेब सातव यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याने या प्रभागात नगरसेवक पदाच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक लागली आहे. या जागेसाठी राष्ट्रवादीकडून कोणाला उमेदवारी दिली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच संगीता सातव यांनी गुरुवारी (दि. 6) उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी नगराध्यक्ष पौर्णिमा तावरे, उपनगराध्यक्ष नवनाथ बल्लाळ, गटनेते सचिन सातव, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, शहराध्यक्ष इम्तियाज शिकलकर, महिला अध्यक्ष अनिता गायकवाड, नगरसेवक संजय संघवी, सत्यव्रत काळे, अमर धुमाळ गणेश सोनवणे, सुरज सातव, संतोष जगताप, नगरसेविका सुहासिनी सातव, आशा माने, प्रताप पागळे, सिद्धनाथ भोकरे, सतीश कोकरे, दीपक मलगुंडे, आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. दि. 30 मे ते गुरुवार (दि. 6) पर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत होती. मात्र, हे तीनही अर्ज गुरुवारीच दाखल झाले.
सुरुवातीला राष्ट्रवादीच्या उमेदवार संगीता सातव यांचा अर्ज दाखल झाला. संगीता सातव यांचा एकमेव अर्ज दाखल होऊन निवडणूक बिनविरोध होणार अशी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर काही वेळातच शुभम मोरे व अनिल मोरे यांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले. अर्ज मागे घेण्यासाठी गुरुवारी (दि. 13) अंतिम दिवस असून रविवारी (दि. 23) प्रत्यक्ष निवडणूक होणार असून सोमवारी (दि. 24) निकाल जाहीर होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी हेमंत निकम यांनी काम पाहिले. यावेळी मुख्याधिकारी योगेश कडूसकर उपस्थित होते.