बनावट कागदपत्रांद्वारे खंडणीची मागणी

जमीन हडपण्याचा डाव : वकिलासह तिघांविरोधात गुन्हा 

पुणे – जमिनीचे बनावट दस्तऐवज तयार करुन हे दस्तऐवज न्यायालयात सादर करुन “तुमची जमीन ताब्यात घेऊ’, अशी धमकी देत इस्टेट एजंटकडे 25 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली. या प्रकरणी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात एका वकिलासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ऍड. जी. आर. शर्मा , सुधीर कामत, इशराक खान असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी मनीष हरेश मिलाणी (39, रा. मुंढवा) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, इशराक खान हा इस्टेट एजंट असल्याने फिर्यादींची त्याच्याशी ओळख होती. ओळखीतून फिर्यादीची सुधीर कामत व ऍड. शर्मा यांच्याशी ओळख झाली. मनीष यांच्या मालकीची लोहगाव येथे 69.33 एकर जमीन आहे. वडील वयोवृध्द असल्याने कुलमुखत्यार पत्र मनीष यांना दिलेले आहे. मनीष यांच्या जमिनीलगतच संरक्षण खात्याची जमीन आहे.

मनीष यांच्या जमिनीसंदर्भात संरक्षण खाते व फिर्यादी याच्यामध्ये वाद होते. यातूनच संरक्षण खात्याने फिर्यादी यांच्या विरोधात सी.बी.आय.कडे तक्रार दिली. परंतु संरक्षण खात्याने फिर्यादी यांची जमीन संपादित केली नसल्याने केसचा निकाल फिर्यादींच्या बाजूने लागला. दरम्यान, मनीष यांनी देखील संरक्षण खात्याविरुध्द जमिनीसंदर्भात शिवाजीनगर दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला होता. त्याचबरोबर शिवाजीनगर न्यायालयात फौजदारी दावाही सुरू आहे.

2015 साली इशराक खान फिर्यादींना ओकवूड हॉटेलात भेटला. “जमिनीमध्ये मला हिस्सा द्या नाहीतर मी बनावट कागदपत्रे तयार करुन फोटो झिंकोचे रेकॉर्डमध्ये ठेवून देईल’ अशी धमकी दिली. असे न करण्यासाठी मनीष यांनी खान याला 1 लाख रुपये दिले. यानंतर वकील शर्मा यांनी जमिनीसंदर्भात फिर्यादीविरुध्द शिवाजीनगर न्यायालय, उच्च न्यायालय, सर्वोच्य न्यायालयात अर्ज केले. अर्जाची सुनावणी होऊन मुंबई उच्च न्यायालयाने 17 एप्रिल 2017 रोजी ऍड. शर्मा यांचा अर्ज फेटाळून लावला. त्यानंतर 17 जून 2017 रोजी वकील शर्मा हे फिर्यादी यांना शिवाजीनगर न्यायालयात भेटले.

फिर्यादी यांना “तुला तुझी जमीन मिळू देणार नाही’, अशी धमकी देत “हा त्रास नको असेल तर मला एक कोटी रुपये द्या’ अशी मागणी मनीष यांकडे केली. त्यानंतर मार्च 2018 मध्ये सुधीर कामत याने फिर्यादीला फोन केला. “मी तुमच्या जमिनीची तडजोड करुन देतो. मात्र, यासाठी मला जमिनीचा काही हिस्सा द्या’ अशी मागणी केली. 2015 ते 21 मार्च 2018 दरम्यान शहरातील विविध ठिकाणी वकिल शर्मा, खान, कामत यांनी आपापसात संगनमत करुन फिर्यादी यांच्या जमिनीचे बनावट दस्तऐवज करुन ते न्यायालयात दाखल करुन फिर्यादींची जमीन ताब्यात घेण्याची धमकी दिली. तसेच असे न करण्याकरीता 25 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली. या प्रकरणी अधिक तपास कोरेगाव पार्क पोलीस करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)