जेजुरीच्या मुख्याधिकाऱ्यांबाबत संताप

नगरसेवकांनी दिला आंदोलनाचा इशारा; शहरातील विकासकामे रखडली

जेजुरी- जेजुरी नगरपालिकेचे मुख्याधिकारी मुख्यालयात येत नसल्याने दुषित पाणी, अस्वच्छता यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे तसेच अन्य सरकारी कामातही अडथळे येत आहेत. मुख्याधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे नागरिकांत नाराजीचे वातावरण असून शासनाने याबाबत दखल घ्यावी अन्यथा जेजुरी बंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा नगरसेवक अजिंक्‍य देशमुख व माजी नगरसेवक हेमंत सोनवणे यांनी दिला आहे.

जेजुरी पालिकेत 2017 मध्ये संजय केदार हे मुख्याधिकारी म्हणून रुजू झाले. जेजुरीच्या विकासासाठी व नागरिकांच्या मुलभूत गरजा पूर्ण होणे अपेक्षित असताना त्यांच्याकडून शासनाच्या नियमानुसार व आदेशानुसार नगरपालिका व नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवकांच्या अधीन राहून काम करणे अपेक्षित होते. मात्र, ते नगरपालिकेत गैरहजर राहत असल्याने प्रशासकीय कामात अडथळे येत आहेत. गेली अनेक दिवसांपासून शहरातील वेताळनगर, विद्यानगर, मोरगाव रोड, रेल्वे स्टेशन परिसर आदी भागात दुषित पाणी पुरवठा केला जात आहे. पाणी गढूळ आणि दुर्गंधीयुक्त येत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. नागरिकांच्या तक्रारी ऐकण्यासाठी मुख्याधिकारी पालिकेत नसल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
लोकसभेची निवडणूक (दि.21) संपली. परंतु, दि. 22 एप्रिल ते 25 मे या कालवधीत केवळ चार ते पाच दिवस मुख्याधिकारी पालिकेत उपस्थित होते. इतर दिवस ते पालिकेत फिरकले नाहीत. या संदर्भात नगराध्यक्षा व नगरसेवकांचा फोन ते घेत नसल्याची नगरसेवकांची तक्रार आहे. जेजुरी शहरात अनेक भागात चेंबर तुटले आहेत. चेंबर दुरुस्तीचे ठेका मंजूर करूनही गेली आठ ते दहा महिने संबधित ठेकेदाराला वर्क ऑर्डर दिली गेलेली नाही. रस्ते दुरुस्तीचाही ठराव होवूनही निविदा काढली गेलेली नाही. शहरातील एलईडी दिवे बंद आहेत. ठेकेदाराने कामे अर्धवट सोडलेली आहेत. कडेपठार रस्त्याचे काम बंद आहे. नागरिकांच्या तक्रारींचे निवारणही ठप्प आहे.

जेजुरी पालिकेला नोव्हेंबर 2018 मध्ये विशेष वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत दोन कोटी रुपयांचा निधी नगरध्यक्षा व नगरसेवकांनी शासनाकडून पाठपुरावा करून मिळविला. या निधीतून अत्याधुनिक भाजी मंडई व तालीम बांधण्याचा ठराव मंजूर होवूनही मुख्याधिकाऱ्यांनी अद्याप प्रस्ताव तयार केलेला नाही. मुख्याधिकारी कामाबाबत जेजुरीकरांत नाराजी असून शासनाने या संदर्भात दाखल न घेतल्यास नागरिकांच्या वतीने जेजुरी शहरात बंद पुकारण्यात येणार असल्याची माहिती नगरसेवक अजिंक्‍य देशमुख व माजी नगरसेवक हेमंत सोनवणे यांनी दिली.

  • मी नियमित मुख्यालयात हजर असून आचारसंहितेमुळे नगराध्यक्षा व काही नगरसेवकच पालिकेकडे फिरकले नाहीत. माझ्यावर केलेले आरोप चुकीचे व खोडसाळपणाचे आहेत. नाझरे धारणातील पाणी साठा संपत आल्याने त्यातून गाळ मिश्रीत पाणी येते. मांडकी योजनेतून मिळणारे पाणी अपुरे पडत आहे. तरीही नागरिकांना स्वच्छ पाणी देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत.
    – संजय केदार, मुख्याधिकारी, जेजुरी नगरपालीका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)