जुन्नर तालुक्‍यात 2014 च्या तुलनेत सव्वापाच टक्के कमी मतदान

ओतूर- लोकसभा निवडणुकीकरिता यावेळी जुन्नर तालुक्‍यात सुमारे 64.75 टक्के मतदान झाले. तुलनेने 2014 च्या तुलनेत सुमारे 5.25 टक्के मतदान कमी झाले आहे. मागील लोकसभा निवडणुकीत जुन्नर तालुक्‍यात जवळपास 70 टक्के मतदान झाले होते. यंदादेखील अशाच प्रकारचे वातावरण राहते की काय अशी परिस्थिती वाटत होती; परंतु तरुण व ज्येष्ठ महिला मतदारांनी दाखविलेल्या विशेष उत्साहामुळे सकाळपासूनच मतदार केंद्रांवर गर्दी होती. मात्र, नवमतदारांना मतदान करता आले नसल्याने आणि मतदान प्रक्रियेतील किरकोळ त्रुटींमुळे मतदार मतदानापासून वंचित राहिल्यामुळे 2014 च्या लोकसभा निवडणुकीपेक्षा मतदानाचा टक्का घसरला असल्याचे चित्र जुन्नर तालुक्‍यात स्पष्ट झाले आहे.

जुन्नर तालुक्‍यात 2014 च्या लोकसभा निवडणुकी करता शिवसेनेचे खासदार शिवाजी आढळराव पाटील यांना आघाडी मिळाली होती. मात्र, यावेळी कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसने जुन्नर तालुक्‍यातीलच डॉ. अमोल कोल्हे यांना उमेदवारी दिल्याने खासदार आढळराव पाटलांना तालुक्‍यात आघाडी मिळते की नाही, अशी अवस्था आहे. मात्र, खासदार आढळराव पाटील यांनी केलेल्या कामाची पावती आणि जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांची शिवसेना एण्ट्री त्यामुळे गटनेत्या आशा बुचके यांची झालेली नाराजी दूर करण्यात आढळराव पाटील यांना आलेले यश, त्यातून सर्व शिवसैनिक व नेत्यांचे बंधन या निवडणुकीत पाहायला मिळाले. याचा फायदा निश्‍चितच आढळराव पाटील यांना तालुक्‍यात होणार आहे. शिवसेनेचे नेते मंडळी एकमेकातील हेवेदावे विसरून तालुक्‍यात एक दिलाने उमेदवाराचे काम करीत होते, असे चित्र असल्याने आणि शिवसेना-भाजपचे हक्काचे मतदान तालुक्‍यात असल्याचा फायदा आढळराव पाटील यांना नक्कीच होणार आहे. मागील निवडणुकीपेक्षा या निवडणुकीत खासदार आढळराव पाटील हे मतांची मोठ्या प्रमाणावर आघाडी घेतील, असा विश्वास कार्यकर्त्यांमधून आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये व्यक्त होत आहे. कारण आढळराव पाटील यांनी निवडणूकपूर्व बेरजेचे राजकारण करून सर्वांना आपलेसे करण्यात यश मिळविले आहे.

कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे हे जुन्नर तालुक्‍यातीलच रहिवासी आहेत. त्यांचा मित्रपरिवार,हितसंबंध, नातेसंबंध जुन्नर तालुक्‍यात मोठ्या प्रमाणावर आहेत. सिनेस्टार असल्याने त्यांची प्रतिमा जनसामान्यांपर्यंत पोहोचलेली आहे, तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा नेते अतुल बेनके आणि राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ व युवा कार्यकर्त्यांनी देखील डॉ. अमोल कोल्हे यांना निवडून आणण्यासाठी विशेष प्रयत्न केलेले आहेत. विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर यांनी देखील डॉ. कोल्हे यांना मदत केली आहे. त्यांना निवडून आणण्यासाठी राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या सर्वच नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी चंग बांधल्याचे बोलले जात होते आणि सोशल मीडियावरून अशा प्रकारच्या प्रचारात्मक पोस्ट देखील केल्या जात होत्या. तालुक्‍यात दोन्ही उमेदवारांसाठी दिग्गज नेत्यांच्या झालेल्या सभांचा देखील फायदा उमेदवारांना होणारच आहे. कोणाचा कोणाला कसा फायदा होईल व कोण निवडून येणार, हे जरी 23 मे ला निकलाअंती समजणार असले तरी जुन्नर तालुक्‍यातील सुज्ञ मतदार जनतेने कोणाच्या पारड्यात मतांचा जोगवा टाकून तालुक्‍यातून आघाडी दिलीय, अशा निरनिराळ्या चर्चा राजकीय गोटातून ऐकावयास मिळत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)