चासकमान धरणातून आवर्तन सुरू

भीमा नदीत 300, डावा 550, तर उजवा कलव्याला 20 क्‍युसेसने सोडले पाणी

राजगुरूनगर- राजगुरूनगर शहरासह परिसरातील गावांना पिण्याच्या पाण्याची गरज भागविण्यासाठी चासकमान धरणातून सोमवारी (दि. 22) सकाळी 6 वाजल्यापासून भीमानदीत 300 क्‍युसेस, डावा कालव्याला 550 क्‍युसेस तर उजवा कालव्याला 20 क्‍युसेसने पाणी सोडण्यात आले आहे, अशी माहिती चासकमान धरणाचे उपभियांता उत्तम राऊत यांनी दिली.

राजगुरूनगर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या केदारेश्‍वर बंधाऱ्यातील पाणी आटल्याने शहरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यावर मोठा परिणाम झाला आहे. शहरासह सातकरस्थळ, तिन्हेवाडी, मांजरेवाडी टाकळकरवाडी, निमगाव, शिरोली, खरपुडी, दोंदे, वाकी बुद्रुक चांडोली, वडगाव, कडूस आदि गावे व वाड्यावस्त्यांमधील विहिरीतील पाणीसाठे आटले आहेत. पिण्याच्या पाण्याचे जलस्त्रोत आटल्याने संबंधित गावातील नागरिकांनी जिल्हाधिकारी व चासकमान धरण अभियंत्यांकडे धरणातून पाणी सोडण्याबाबत मागणी केली होती. उपलब्ध पाण्याची टंचाई आणि नागरिकांची मागणी लक्षात घेत जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेवून पाणी सोडण्याचा आदेश चासकमन धरण प्रशासनाला दिला होता. त्यानुसार केदारेश्‍वर बंधाराभरेपर्यंत भीमा नदीपात्रात 300 क्‍युसेसने पाणी सोडण्यात आले आहे, बंधारा भरल्यानंतर नदीत सोडण्यात येणारे पाणी बंद केले जाणार आहे. डावा कालव्याच्या परिसरातील गावांसाठी फक्‍त पीण्यासाठी 8 ते 10 दिवस 550 क्‍युसेसने पाणी सोडण्यात आले आहे. त्यानंतर पाणी बंद करण्यात येणार आहे. धरणाच्या उजवा कालव्यात 20 क्‍युसेस वेगाने सोडलेले पाणी 10 दिवस सुरू राहणार आहे.

 • या गावांची समस्या सुटणार
  चासकमान – धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे मोहकल, कडधे, कान्हेवाडी, चासकमान, चास, आखरवाडी, पांगरी, पाडळी व खेड तालुक्‍यातील इतर गावांतील पाण्याची समस्या दूर होणार आहे.
 • चासकमान धरणाचे पाणी केदारेश्‍वर बंधाऱ्यात पोहोचण्यास व तो भरण्यात दोन दिवस लागणार असल्याने नागरिकांनी उपलब्ध पाणी जपून वापरावे. दोन दिवस बंधाऱ्यात पाणी नसल्याने पाणीपुरवठा बंद राहणार आहे. नागरिकांनी दोन दिवस सहकार्य करावे.
  – शिवाजी मांदळे, नगराध्यक्ष, राजगुरूनगर नगरपरिषद
  उपभियंता उत्तम राऊत यांनी सांगितले कि
 • चासकमान धरणात केवळ 16 टक्‍के पाणीसाठा शिल्लक आहे. उपलब्ध पाण्याचे नियोजन करून राजगुरुनगर शहरातील नागरिकांसाठी व डावा-उजवा कालव्या जवळील गावातील पाणीपुरवठा योजनेतून नागरिकांना पुरवठा करण्यासाठी पाणी सोडण्यात आले आहे. नागरिकांनी उपलब्ध पाणी काटकसरीने वापरावे. उन्हाळा असल्याने नदी व कालव्या जवळील शेती वीजपंप बंद ठेवण्यात आले आहेत.
  – उत्तम राऊत, उपअभियंता, चासकमान धरण
Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)