खिडकीवाटे चोऱ्या करणारा सराईत जेरबंद

लॅपटॉप, दागिने असा दिड लाखाचा ऐवज हस्तगत
पुणे,दि.24- खिडकीवाटे घरातील लॅपटॉप, मोबाईल, दागिने असा किंमती ऐवज चोरणाऱ्या सराईत गुन्हेगारास युनिट चारच्या पथकाने जेरबंद केले आहे. त्याच्या ताब्यातून दोन लॅपटॉप, सोन्याचे मंगळसूत्र असा दिड लाखाचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.
चंद्रकांत बापू साळवे(29,रा.चंदननगर) असे अटक आरोपीचे नाव आहे.
चंदननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील काही दिवसांत रात्रीच्या वेळी घराची खिडकी उघडून लोखंडी पाईपच्या सहाय्याने मोबाईल, लॅपटॉप, सोने व इतर किंमती ऐवजाची चोरी केली जात होती. याप्रकरणी दोन तक्रारी दाखल झाल्या होत्या. पहिल्या तक्रारीत वॉचमनचे काम करणाऱ्याच्या मुलीचा लॅपटॉप चोरीला गेला होता. त्याने मुलीच्या शिक्षणासाठी लॅपटॉप हप्त्याने खरेदी केला होता. लॅपटॉपचे दोनच हप्ते भरलेले असताना तो चोरीला गेला. यामुळे त्यांच्या मुलीच्या शिक्षणात मोठा व्यत्यय आला होता. तर दुसरा तक्रारदार हा आयटी कंपनीत डेटा बेस ऍडमीन म्हणून काम करत आहे. त्याने लॅपटॉवर रात्रभर जागून अतिमहत्वाचा प्रोजेक्‍ट पुर्ण केला होता. त्याला तो दुसऱ्या दिवशी कंपनीत प्रस्तुत करायचा होता. मात्र त्याचा लॅपटॉप, मोबाईल आणी सोने चोरण्यात आले.
चंदननगर पोलीस ठाण्यात दोन्ही तक्रारी दाखल झाल्यावर गुन्हे शाखेचे युनिट चारचे पथक समांतर तपास करत होते. तपास करताना पोलीस कर्मचारी अब्दुलकरीम सय्यद व सचिन ढवळे यांना सराईत गुन्हेगार चंद्रकांत साळवे अशा प्रकारच्या चोऱ्या करत असल्याची माहिती मिळाली. त्यानूसार त्याच्यावर पाळत ठेवण्यात आली. तो चंदननगर येथील पाण्याच्या टाकीजवळ लॅपटॉप विकायला येणार असल्याची खबर मिळताच सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून चोरीचा माल हस्तगत करण्यात आला. तसेच आणखी एक सॅमसंग कंपनीचा मोबाईलही हस्तगत केला गेला. त्याच्यावर यापुर्वी विमाननगर, येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
ही कारवाई पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहायक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे, पोलीस निरीक्षक अंजुम बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय झंजाड, पोलीस कर्मचारी अब्दुलकरीम सय्यद, सचिन ढवळे, शंकर पाटील, गणेश साळुंके, राजू मचे, भालचंद्र बोरकर, हनुमंत बोराटे, रमेश सावळे, अतुल मेंगे यांच्या पथकाने केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)