ऐन दुष्काळात शेतीला संजीवनी

जुना कालव्यामुळे हवेली तालुक्‍यातील शेती ओलिताखाली : अठरा वर्षांनंतर पाणी मिळाले

राजेंद्र काळभोर

लोणी काळभोर- नवीन मुठा उजव्या कालव्याचे पाणी बंद झाल्यामुळे हवेली, दौंड व इंदापूर तालुक्‍यातील 66 हजार हेक्‍टर शेतीच्या पाण्याचा व परिसरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. मात्र, जुन्या कालव्याला पुणे महानगरपालिकेचे पाणी येत असल्याने हवेली तालुक्‍याचा पूर्व भाग व दौंड तालुक्‍याच्या पश्‍चिम भागातील शेतीला जुना कालवा वरदान ठरत आहे. दरम्यान, करारानंतर तब्बल 18 वर्षांनी पाणी मिळाल्याचे बोलले जात आहे.
खडकवासला धरण साखळीतील खडकवासला, पानशेत, वरसगाव व टेमघर ही चार धरणे पुणे शहराच्या पश्‍चिम दिशेला आहेत. या चारही धरणांची साठवण क्षमता 29.15 टीएमसी आहे. या पाण्यावर पुणे शहराची पिण्याच्या पाण्याची व हवेली, दौंड व इंदापूर तालुक्‍यातील 66 हजार हेक्‍टर शेतीच्या पाण्याची गरज भागत होती. मात्र, दिवसेंदिवस शहराची पाण्याची मागणी वाढत आहे. त्यामुळे तीन तालुक्‍यांतील शेतीला पाणी कमी पडत आहे.

सुरुवातीला पुणे शहराला साडेसहा टीएमसी पाणी पिण्यासाठी लागत होते. वाढत्या लोकसंख्येमुळे हे पाणी कमी पडल्यामुळे जलसंपदा विभाग व महानगरपालिका यांच्यात एक करार झाला. यानुसार पालिकेला सहा टीएमसी पाणी वाढवून मिळाले. वाढवून घेतलेले सहा टीएमसी पाणी मुळा मुठा नदीतून मुंढवा येथे उचलून त्या पाण्याचे शुद्धीकरण करून हे पाणी साडेसतरा नळी येथे जुन्या कालव्यात सोडायचे, असे 1997 मध्ये झालेल्या करारात ठरले होते. मात्र, प्रत्यक्षात हे पाणी कालव्यात यायला 2015 उजाडले. हे पाणी हवेलीच्या पूर्व व दौंड तालुक्‍याच्या पश्‍चिम भागातील शेतीला दिले जाते. हे पाणी दौंड तालुक्‍यातील शेतीला मिळावे म्हणून आमदार राहुल कुल यांनी प्रयत्न केले. सीएसआरच्या माध्यमातून त्यांनी दौंड तालुक्‍यात जुना कालवा दुरुस्तीची व कालव्याची लांबी वाढवण्याची कामे केली आहेत. त्यामुळे दौंड तालुक्‍यातील जुन्या कालव्याचे लाभक्षेत्र वाढले आहे. इंदापूर तालुका मात्र याविषयी कमनशिबी ठरला आहे.

सध्या नवीन मुठा उजव्या कालव्याचे पाणी बंद आहे. या उन्हाळ्यात नवीन मुठा उजव्या कालव्यात आवर्तन मिळण्याची अजिबात शक्‍यता नाही. पाऊस पडल्यानंतरच नवीन कालव्याला पाणी येणार आहे. तोपर्यंत जुन्या कालव्याचे पाणी या भागातील शेतीसाठी शब्दशः वरदान ठरत आहे. हे पाणी सुरवातीला आले होते त्या वेळी काही लोकांनी अशुद्ध व घाण अशा शब्दांत या पाण्याची संभावना केली होती. मात्र पुणे शहरातील वाढत्या लोकसंख्येमुळे नवीन मुठा उजव्या कालव्याची आवर्तने फारच कमी झाली. त्यामुळे हे अशुद्ध व घाण पाणी नागरिकांनी गोड मानून शेतीला द्यायला सुरुवात केली. गेल्या वर्षीच्या उन्हाळ्यात याच पाण्यावर भाजीपाल्याची पिके घेऊन लाखो रुपये कमावले. जुन्या मुठा कालव्याला पाणी आले. या पाण्यामुळे हवेली व दौंडमधील शेतकऱ्यांना ऐन उन्हाळ्यात जीवदान मिळाले आहे.

  • प्रक्रिया न केलेले सांडपाणी शेतीला वरदान
    महापालिकेने जलसंपदा विभागाला सहा टीएमसी पाणी वाढवून द्यावे, अशी मागणी केली. जलसंपदा विभागाने ही मागणी मान्य केली. परंतु वाढवून दिलेले सहा टीएमसी पाण्याच्या बदल्यात महापालिकेने सहा टीएमसी सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी जुन्या मुठा उजव्या कालव्यामधून शेतीला पुरवावे, अशी अट महापालिकेला घातली होती. मात्र, ही अट पूर्ण करायला तब्बल 18 वर्षे लागली. हे पाणी जुन्या मुठा उजव्या कालव्यामधून शेतीला पुरविण्यास सुरवात झाली आहे. मुंढवा येथील जॅकवेल प्रकल्पातून पाणी उचलून ते साडेसतरा नळी येथे शुद्धीकरण (?) केले जाते, असे महापालिकेचे म्हणणे आहे. परंतु या पाण्यावर प्रक्रिया न करता हे मैलापाणी आहे तसेच कालव्यात सोडले आहे, असे पूर्व हवेलीतील नागरिकांचे म्हणणे आहे. हे पाणी निकृष्ट दर्जाचे असल्याने नागरिकांच्या आरोग्याच्या तक्रारी वाढल्या आहेत, असा आरोप नागरिक करीत आहेत. महापालिकेने हे पाणी चांगल्या प्रकारे शुद्ध करून मगच सोडावे, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्‍त केली आहे.
Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)