लॉकडाऊनच्या काळात प्रवासी कामगारांना सोनू सूदने आपापल्या प्रांतात परतण्यासाठी वाहनांची सोय करून दिली होती. त्याने विदेशात शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी पुढाकार घेऊन त्यांना मदतही केली होती. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क भरण्यापासून ते ऑपरेशनसाठी लागणारा वैद्यकीय खर्च करेपर्यंत सर्व गरजवंतांची गरज सोनू सूदने या काळात पूर्ण केली होती.
एवढेच नाही तर रोजगार गेलेल्या अनेक बेरोजगार तरुणांना रोजगार मिळावा म्हणून त्याने एका एम्प्लॉयमेंट पोर्टलचीही सुरुवात केली. प्रवासी कामगारांना ही अत्यंत मोलाची मदत केल्याबद्दल अभिनेता सोनू सूदचे सर्वच स्तरांमधून कौतुक झाले होते. त्याच्या या कार्याची दखल संयुक्त राष्ट्रानेही घेतली आहे. एसडीजी स्पेशल ह्युमॅनेटेरियन ऍक्शन ऍवॉर्डसाठी सोनू सूदच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. सोमवारी एका व्हर्च्युअल प्रोग्रॅममध्ये सोनू सूदला प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आपण आपल्या देशवासियांसाठी जे काही करू शकलो, त्याची दखल संयुक्त राष्ट्राकडून घेतली जाणे निश्चितच आनंददायी आहे, असे सोनू सूदने म्हटले आहे.