बारामती – शहरातील सायली हिल परिसरात डासांचा प्रादुर्भाव होऊ नये, याबाबत दक्षता घेतली जात आहे. राष्ट्रवादीचे मंगेश ओमासे यांनी स्वतः पाठीवर पंप घेऊन तणनाशक फवारणी सुरू केली आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर नगर परिषदेच्या माध्यमातून सॅनिटायझर देखील फवारण्यात आले आहे.
बारामती शहरात सध्या संक्रमित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दोनशेच्या उंबरठ्यावर करोनाग्रस्तांची संख्या पोहोचली आहे. करोनासारख्या महासंकटाला तोंड देत असताना सध्या सुरू असलेला वातावरणातील बद्लामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढत आहे. डेंग्यू, मलेरिया, गोचीडताप याविषयी त्यांनी आजारांचा देखील फैलाव होताना दिसत आहे. हे विषाणूजन्य आजार नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणत आहेत. अशा प्रकारचे आजार थांबवायचे असतील तर डासांचा प्रादुर्भाव थांबवणे गरजेचे आहे, हे ओळखून एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडियाचे सदस्य मंगेश ओमासे यांनी सायली हिल परिसरात तणनाशकाची फवारणी सुरू केली आहे. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होणार आहे. ओमासे यांनी यापूर्वी सायली हिल परिसरात स्वच्छता मोहीम राबवली होती. स्वच्छता मोहिमेतून काही टन कचऱ्याची विल्हेवाट त्यांनी लावली. त्यानंतर परिसरात मोठ्या संख्येने वृक्षारोपण करण्यात आले. मंगेशनाना ओमासे मित्र परिवाराने परिसरातील वृक्षसंवर्धनाची जबाबदारी घेतली आहे. परिसरातील झाडांवर सुशोभीकरण देखील करण्यात आले आहे. परिसरात आढळणाऱ्या पक्षी व प्राण्यांविषयी माहितीचे फलक देखील लावण्यात आले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अशा प्रकारचे उपक्रम राबवत असल्याचे ओमासे यांनी “प्रभात’शी बोलताना सांगितले.