नांदूर – दौंड तालुक्यातील नांदूर-सहजपूर परिसरात एका नामांकित कंपनीमुळे करोना बाधितांमध्ये वाढ होऊ लागली आहे. परिसरात अनेक गावांमधून हंगामी कामगार येत आहेत. त्यामुळे एका कंपनीमुळे संपूर्ण परिसर भयभीत झाला आहे. औद्योगिक वसाहतीमधील काही कंपन्यांमध्ये नियमाला हरताळ फासला जात असल्याचा आरोप संतप्त नागरिकांनी केला आहे. प्रथम कंपनीने उपाययोजना न केल्याने अनेक कामगार संक्रमित झाले आहेत. नियम धाब्यावर बसवून उत्पादननिर्मिती करणाऱ्या कंपन्यांवर महसूल प्रशासनाकडून चाप लावला जात नाही, हीच नागरिकांची डोकेदुखी झाली आहे.
काही दिवसांपूर्वी 23 जण बाधित रुग्ण सापडल्याने सहजपूर, नांदूर, बोराटे वस्ती हा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले होता. एका नामांकित कंपनीमधील काम करणारे काही कामगार निगेटिव्ह आले आहेत. काही बाधित कामगार उपचार घेत आहेत. अनेक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे चित्र दिसत आहे. नांदूर औद्योगिक वसाहतीमध्ये “हॉटस्पॉट’मधून कामगार कामाला येत आहेत. त्यांच्यामार्फत इतर कामगारांमध्ये संसर्ग फैलावत असल्याचे दिसत आहे. दोन्ही गावांमध्ये पुन्हा करोना संक्रमित संख्या वाढत असल्याची चिंता नागरिकांना सतावत आहे. परिसरातील गावांमध्ये रुग्णांमध्ये वाढ होत आहे. कंपनीने उपाययोजना काय केल्या आहेत, असा सवाल व्यक्त होत आहे. याबाबत तहसीलदार संजय पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचा संपर्क होऊ शकला नाही.
पुणे, हवेली, दौंड तालुक्यातून कामगार कामाला येत आहेत. त्याचा रिपोर्ट, तसेच ते बाधित आहेत का, हे पाहिले जात नाही. संबंधित भागातील शासकीय अधिकारी यांनी लक्ष देणे गरजेचे आहे. येथील कंपन्या गेल्या पाच दिवसांपासून जोरात सुरू झाल्या आहेत. एका नामांकित कंपनीमुळे बाधित गावोगावी सापडत आहेत. यामध्ये काही हंगामी कामगारांच्या उपचाराचा प्रश्न अद्याप प्रलंबित आहे. याकडे संबंधित विभाग लक्ष देणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.
- नांदूर-सहजपूर औद्योगिक वसाहतीमध्ये करोना बाधित रुग्ण आढळल्यास पाहणी करून व वरिष्ठ अधिकारी यांच्याशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेण्यात येईल.
– दीपक कोकरे, मंडलधिकारी, यवत. - राज्य शासनाच्या आदेशानुसार प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये जीवनावश्यक वस्तूंची विक्री वगळून इतर दुकाने व पूरक घटक बंद ठेवणे बंधनकारक आहे, तसे आढळून आल्यास त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल.
– प्रमोद गायकवाड, प्रांताधिकारी, दौंड.