कॅन्टोन्मेंट ( दि. 6 ) कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून सुनील कांबळे यांच्या रूपाने भाजपने नवा चेहरा दिला आहे. दरम्यान, कांबळे यांच्या कार्यकर्त्यांकड़ून वेगवेगळ्या माध्यमातून त्यांच्या प्रचाराला सुरूवात केली आहे. दरम्यान, कांबळे यांनी मतदारसंघातील सामाजिक संघटना, सार्वजनिक मंडळ, संस्था तसेच ज्येष्ठ नेत्यांच्या भेटी, तसेच महायुतीमधील घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेत प्रचाराचे नियोजन सुरू केले असल्याचे चित्र आहे. या मतदारसंघात आपला विजय निश्चित असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
भाजपकडून कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातून महापालिकेतील स्थायी समितीचे अध्यक्ष सुनील कांबळे यांना संधी दिली आहे. त्यामुळे या मतदारसंघात पुन्हा भाजपचा झेंडा फडकविण्यासाठी कांबळे यांच्याकडून जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी आवश्यक नियोजन शहर भाजपसह कांबळे यांच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आले असल्याचे चित्र आहे. त्यासाठी गेल्या तीन दिवसात कांबळे यांनी मतदारसंघात भाजपसह महायुती मधील शिवसेना, रिपाई, शिवसंग्राम या पक्षांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भेटी तसेच बैठका घेण्याचे सत्र सुरू केले आहे. या बैठकांमध्ये सर्व पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना समाविष्ट करून प्रचाराचे नियोजन करण्यात येत असल्याचे कांबळे यांनी स्पष्ट केले.
विकास हाच प्रचाराचा मुद्दा
दरम्यान, आपल्या प्रचाराचा रोख मतदासंघात गेल्या पाच वर्षात झालेला विकास आणि केंद्र व राज्यात भाजप सरकारकडून राबविण्यात आलेल्या जनहिताच्या योजनांवर असणार असल्याचे कांबळे यांनी स्पष्ट केले. त्यासाठीचे नियोजन पक्षाकडून तसेच उमेदवार म्हणून आपल्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आले आहे. त्यामुळे मतदारसंघाचा विकास हाच आपल्या प्रचाराचा मुद्दा असणार असणार असून त्याबाबत कार्यकर्ते तसेच पदाधिकाऱ्यांना सूचना तसेच माहितीही देण्यात आल्याचे ते म्हणाले.