- पोलिसांची मागणी; आम्ही देखील सरकारी कर्मचारी आहोत
- पोलिसांना 12 तास राहावे लागते कार्यरत
पिंपरी – सरकारी कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा करण्याचा विचार शासन करीत आहेत. मात्र आम्ही देखील सरकारी कर्मचारी आहोत, आम्हाला पाच दिवसांचा आठवडा नको. फक्त आठ तासाची ड्युटी करा, अशी मागणी पोलिसांकडून दबक्या आवाजात केली जात आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांना आठ तासांची ड्युटी असते. त्यामध्ये 45 मिनिटे वाढविण्यात येणार आहे. त्याबदल्यात सहा ऐवजी पाच दिवसांचा आठवडा करण्याची करण्याची तयारी राज्य शासनाने केली आहे. मात्र आम्ही पोलीस असून सध्या आम्हाला 12 तासांची ड्युटी आहे. इतर सरकारी कर्मचाऱ्यांपेक्षा जास्त आहे. यामुळे कामाचा ताण कमी करण्याची खरी सुरुवात आमच्यापासून होणे गरजेचे आहे. आम्हाला पाच दिवसांचा आठवडा नको पण आठ तासांची ड्युटी करा, अशी मागणी पोलिसांकडून होत आहे.
इतर शासकीय कर्मचाऱ्यांच्या विविध संघटना असतात. त्या संघटना शासनाकडे वेळोवेळी मागण्या करीत असतात. मात्र पोलिसांना अशा प्रकारची संघटना काढता येत नाही. यामुळे पोलिसांवरील अन्यायाकडे कोणाचे लक्ष जात नाही. साप्ताहिक सुट्टी पोलिसांना मिळते. मात्र एखादा सण, निवडणूक, मोठा कार्यक्रम किंवा तणावाचे वातावरण असल्यास पोलिसांच्या सुट्ट्या रद्द केल्या जातात. त्या बदल्यात वेगळी सुट्टी दिली जात नाही. हिंसक घटनांच्यावेळी सर्वाधिक धोका पोलिसांनाच असतो.
पोलिसांचे काम खूप ताण-तणावाचे असते, असे असूनही पोलिसांना 12 तास काम करावे लागते. कधी कधी गुन्ह्याच्या तपासाकरिता कित्येक दिवस कुटूंबापासून दूर जाऊन बाहेरगावी राहावे लागते. यामुळे आठ तासाची ड्युटी केल्यास पोलिसांवरील कामाचा ताण कमी होणार असल्याने आता निवृत्त पोलिसांच्या संघटना याबाबत पुढे आल्या आहेत.