दहिवडीतील घटना; चोरटे सीसीटिव्हीत कैद
सातारा, दि.9 (प्रतिनिधी)
दहिवडी (ता.माण) ते फलटण रस्त्यावर असलेल्या बालाजी पेट्रोल पंपावर बुधवार दि.8 रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी कोयत्याचा धाक दाखवून 21 हजारांची रोखड लंपास केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस सीसीटिव्हीच्या आधारे चोरट्यांचा शोध घेत आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी, दहिवडी-फलटण रस्त्यावर तिखाटणे नावाच्या परिसरात बालाजी पेट्रोल पंप आहे. बुधवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास त्याठिकाणी असलेला कर्मचारी पेट्रोल विक्रीचे काम करत असताना एफ झेड या दुचाकीवरून आलेल्या संशयितांनी त्या कर्मचाऱ्याला कोयत्याचा धाक दाखवून त्याच्याकडील 21 हजार रूपयांची रोकड लंपास केली.
या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळावरील सीसीटिव्ही फुटेज तपासून काही संशयितांचा तपास सुरू केला आहे.