- जलद प्रतिसाद पथकाची स्थापना ः शिक्षकांसह वैद्यकीय विभगातील 287 कर्मचाऱ्यांचा सहभाग
पिंपरी – करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना म्हणून जलद प्रतिसाद पथकांची स्थापना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आली आहे. या पथकाने विचारलेली माहिती देऊन त्यांनी सांगितलेल्या सूचनांची नागरिकांनी अंमलबजावणी करावी, असे आवाहन आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यांनी केले.
आंतरराष्ट्रीय स्तरावर आणि देशांतर्गत करोना या विषाणूचे संसर्गबाधित रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे “करोना’ विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेता जलद प्रतिसाद पथकांची स्थापना करण्यात आली आहे. या पथकामध्ये नियुक्तकेलेल्या कर्मचाऱ्यांना चिंचवड येथील ऑटो क्लस्टरमध्ये प्रशिक्षण देण्यात आले.
यावेळी आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. संगीता तिरूमणी, डॉ. शैलजा भावसार, डॉ. विजया आंबेडकर, शिक्षण मंडळाचे सहाय्यक प्रशासन अधिकारी पराग मुंढे आदि उपस्थित होते. ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. बाळासाहेब होडगर यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे या पथकाला प्रशिक्षण दिले.
या पथकामध्ये मोरवाडी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि कासारवाडी येथील साई शारदा महिला औद्योगिक प्रशिक्षण केंद्राचे 38 निदेशक, क्रीडा शिक्षक 35, वैद्यकीय विभागातील 22 मल्टी पर्पज वर्कर आणि 64 ए.एन.एम. तसेच माध्यमिक शिक्षण विभागांतर्गत शाळांमधील 98 उपशिक्षक तर 30 सहाय्यक शिक्षक अशा एकूण 287 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या जलद प्रतिसाद पथकाअंतर्गत तयार करण्यात येणाऱ्या टीममध्ये 4 कर्मचारी कार्यरत असणार आहेत. त्यांना शहरातील नेमून दिलेल्या भागांमध्ये जाऊन कामकाज करायचे आहे.
असे असेल कामकाज
जलद प्रतिसाद पथकाने स्वत:च्या आरोग्याची काळजी घेऊन नागरिकांशी संवाद साधायचा आहे. नागरिकांना “करोना’ सुरक्षेच्या दृष्टीने सर्व खबरदारी घेण्यासाठी आवश्यक त्या सूचना द्याव्यात. तसेच नागरिकांशी उत्तम समन्वय ठेऊन करोना विषाणू संसर्गाचे गांभिर्य पटवून द्यावे. ज्या ठिकाणी खासगी क्लासेस अथवा गर्दी करणारे कार्यक्रम सुरु असतील ते तात्काळ बंद करण्याची कार्यवाही करावी. सर्वेक्षण करताना मिळालेली माहिती गोपनीय ठेवणे आवश्यक आहे. सकाळी 8 ते दुपारी 2 या वेळेत गृहभेटी करून माहिती संकलित करावी आणि तात्काळ नियंत्रण केंद्रास अहवाल सादर करावा अशा सूचना या प्रशिक्षणा दरम्यान देण्यात आल्या.