कराड – वनवासमाची (ता. कराड) येथे एका युवकाचा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यातील मृत युवकाची ओळख सोमवारी रात्री पोलिसांना पटली. संबंधित युवकाचा खून पाच लाख रुपयांच्या देवाण-घेवाणीवरून झाला असून या प्रकरणात तीन जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यातील दोघांना पोलीस कोठडी मिळाली असून अन्य एका जखमीवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिली.
येथील पोलीस उपअधीक्षक कार्यालयात आयोजीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर, पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर, तळबीडचे सहाय्यक पोलीस निरिक्षक राहुल वरूटे उपस्थित होते. श्री. शेख म्हणाले, या प्रकरणात खून झालेल्या युवकासह त्याचा खून करणारे सर्वजण कर्नाटकमधील आहेत. केशवमूर्ती आर. चिन्नाप्पा रंगास्वामी (वय 37, रा. आरेहल्ली पो. मायासिंद्रा, ता. अनकेल, जि. बंगळूरू) असे खून झालेल्याचे नाव आहे.
तसेच मृत केशवमूर्ती याच्या परिचयातील तिघांनी त्याला वनवासमाची येथे आणून त्याचा खून करून, मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला आहे. पोलीस उपअधीक्षकांचे पथक व तळबीड पोलिसांनी संयुक्तपणे या प्रकरणाचा तपास करताना तांत्रिक पुराव्यांच्या आधारे अवघ्या तीन दिवसात त्याचे धोगेदोरे शोधून काढले आहेत. केशवमूर्तीला निदर्यीपणी जाळून मारल्याबद्दल त्याच्याच गावातील मंजुनाथ सी (वय 33) याच्यासह शिवानंद बिरादार (वय 26, रा. विजापूर) या दोघांना अटक करण्यात आली असून त्यांना पोलीस कोठडी मिळाली आहे. दरम्यान, केशवमूर्तीचा खून केल्यानंतर त्याचा मृतदेह जाळताना एक संशयीत भाजल्याचा पोलिसांचा संशय आहे. हा संशयीत जखमी असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने त्याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रशांत भिमसे बटवाल (रा. वमनेल-सिंगदी, जि. विजापूर) असे त्याचे नाव आहे.
पोलीस उपअधीक्षक ठाकूर म्हणाले, केशवमूर्तीच्या खून प्रकरणात अटक केलेल्या संशयीतांनी दिलेल्या माहितीनुसार, संबधितांनी केशवमूर्तीकडून पाच लाख रूपये घेऊन त्याला नोकरी लावतो असे सांगितले होते. परंतु, सदरची रक्कम परत करण्याचा तगादा केशवमूर्तीने संबधितांकडे लावला होता. त्याला तैतागून त्यांनी त्याचा खून केला आहे. यामध्ये संबधितांनी चारचाकी गाडी वापरली आहे. त्याचा खून कोठे केला, याबाबतची माहितीही लवकरच समोर येईल. खून झालेला केशवमूर्ती आणि संशयीतांचे नातेसंबध आहेत. तरीही त्यांनी केशवमूर्तीचा अत्यंत निर्दयीपणे खून केला आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी तळबीडच्या पोलीस पथकाने चांगले कष्ट घेतले आहेत. त्याचसोबत पोलीस उपअधीक्षक कार्यालयातील पथकानेही यामध्ये त्यांना मदत केली आहे.