जालना – जिल्ह्यातील सेलगाव येथे एका महिलेचा विनयभंग करत मारहाण करण्याचा प्रकार समोर आला आहे. सदर महिलेचा पुतण्या व आरोपी व्यक्तीच्या मुलीचे प्रेमप्रकरण होते. हे प्रेमीयुगल लग्नाला विरोध करतील म्हणून गावातून पळून गेले होतो. याचा राग मनात धरुन मुलीच्या नातेवाईकांनी तुझ्या पुतण्यानं आमच्या मुलीला पळवलंय, तो कुठे आहे सांग असे म्हणत महिलेस मारहाण व विनयभंग केली.
या घटनेप्रकरणी पीडित महिलेनं आष्टी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोपान श्रीमंत लिपणे असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे.
या घटनेबाबत मिळालेली माहिती अशी की, 35 वर्षीय पीडित महिला आपल्या घरासमोरील ओसरीत बाजेवर झोपली होती. यावेळी गावातील सोपान श्रीमंत लिपणे पीडितेच्या घरी आला. यावेळी त्यानं पीडितेला शिवीगाळ करत मारहाण केली आहे. तुझ्या पुतण्यानं आमच्या मुलीला पळवून नेलं आहे; तो कुठे आहे? सांग म्हणत आरोपीनं पीडितेला बेदम मारहाण केली आहे. तसेच या महिलेला जीवे मारण्याची धमकी देत घरासमोर दुचाकीचं नुकसानही केले आहे. या घटनेचा पुढील तपास जमादार एस बी बिक्कड करीत आहेत.