पुणे – नुकतेच भारताच्या अंडर-19 संघाने विक्रमी पाचव्या वेळी विश्वचषक जिंकला. विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताने इंग्लंडला मात देत ही किमया साधली. इंग्लंडच्या छोट्याशा आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाची आघाडीची फलंदाजी काही खास करु शकली नाही. तरीही मधल्या फळीतील फलंदाजांनी सावध फलंदाजी करत भारताला विजय मिळवून दिला.
यामध्ये 7 व्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या दिनेश बाणाने अवघ्या 5 चेंडूत 13 धावा करुन भारताला विजय मिळवून दिला. यामध्ये दिनेश बानाच्या विजयी षट्काराचाही समावेश होता.
या पार्श्वभूमीवर विश्वचषकाच्या पूर्वी दिनेश बाणाबद्दलचा एक खास किस्सा या लेखातून जाणून घेणार आहोत. तारीख होती 10 नोव्हेंबर 2021, अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर अंडर-19 चॅलेंजर ट्रॉफीमध्ये, भारत ब आणि भारत एफ यांच्यात एकदिवसीय सामना खेळला जात होता. ही स्पर्धा खेळाडूंसाठी महत्त्वाची होती. कारण या स्पर्धेतील कामगिरीवरुन खेळाडूंची 2022 अंडर-19 विश्वचषकासाठी निवड होणार होती.
या सामन्यात भारत एफ चा कर्णधार निशांत सिंधूने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारत ब संघाची सुरुवात चांगली झाली नाही. कर्णधार विमल खुमार 10 धावा करून बाद झाला आणि शॉन रॉजरने 34 धावा केल्या.
यानंतर आर स्मरण आणि अक्षत रघुवंशीही झटपट बाद झाले. मात्र राज अंगद बावा आणि सिद्धार्थ यादव यांनी शानदार शतके झळकावत संघाला संकटातून बाहेर काढले. राज बावाने 102 चेंडूत 12 चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 119 धावा केल्या. तर सिद्धार्थ यादवने अवघ्या 79 चेंडूत 134 धावा केल्या. ज्यामध्ये नऊ चौकार आणि 10 षटकारांचा समावेश होता. भारत ब संघाने भारत एफ समोर 352 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात भारत एफ संघाने सलामीवीर अंश गोसाईला लवकर गमावले. तर अर्शीन कुलकर्णीनेही 28 धावा केल्या.
’तू आज फक्त षटकार मोज’
उदय सहारन आणि निशांत सिंधू बाद झाल्यानंतर दिनेश बाना मैदानात आला. तोपर्यंत भारत फ चा अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला होता. विजयाच्या आशा जवळपास संपल्या आहेत. पण दिनेश बाणा वेगळाच विचार करून क्रीझवर आला. वास्तविक, संघाचा कर्णधार निशांत सिंधूने दिनेश बाणाला सांगितले की, आज निवडकर्ते येणार आहेत. त्यानंतर दिनेश बाणाच्या तोंडातून एकच वाक्य निघाले, तो म्हणाला… ’तू आज फक्त षटकार मोज’
…आणि दिनेश बाणाने आपले शब्द खरे केले
आणि दिनेश बाणाने आपले शब्द खरे करत, अवघ्या 98 चेंडूत 170 धावा केल्या. ज्यामध्ये 10 चौकार आणि 14 षटकारांचा समावेश होता. काही षटकार स्टँडच्या बाहेरही गेले होते. दिनेशच्या 170 धावांच्या खेळीनंतरही भारत एफ संघाचा पराभव झाला. संपूर्ण संघ 336 धावांत गारद झाला. पण दिनेश बाणा जे बोलून गेला. त्याने ते केले. त्यामुळे दिनेश निवडकर्त्यांच्या नजरेत आला. आणि त्याला उत्कृष्ट कामगिरीचे बक्षीसही मिळाले. 2022 अंडर-19 विश्वचषकासाठी यष्टीरक्षक म्हणून दिनेशला भारतीय संघात स्थान मिळालेे. विशेष म्हणजे यष्टीरक्षकासाठी दिनेश बाणाला पहिली पसंती नव्हती.
विश्वचषकाचा अंतिम सामना
अंडर-19 विश्वचषकात दिनेशला जास्त फलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही. मात्र जेव्हाही तो क्रिझवर आला तेव्हा षटकार मारण्यात मागे राहिला नाही. दिनेशच्या फटकेबाजी क्षमतेचा अंदाज तुम्ही यावरून लावू शकता की त्याने संपूर्ण स्पर्धेत 5 डाव खेळले. त्याने केवळ 33 चेंडूंचा सामना करत 63 धावा केल्या. यादरम्यान त्याने 5 षटकार मारले. इंग्लंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात दिनेशने 5 चेंडूत 2 षटकारांच्या मदतीने नाबाद 13 धावा केल्या. याआधी, दिनेश ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्य फेरीत अवघ्या 4 चेंडूत 20 धावांची खेळी करून प्रसिद्धीच्या झोतात आला होता. आता सलग दोन चेंडूत दोन षटकार ठोकणार्या दिनेश बानाची तुलना एमएस धोनीशी केली जात आहे.