दहिवडी – मलवडी (ता. माण) येथे श्री खंडोबा यात्रेनिमित्त झालेल्या कुस्ती आखाड्यात चित्तथरारक लढतींनी कुस्ती शौकिनांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. प्रथम क्रमांकाच्या रोमहर्षक लढतीत पैलवान हसन पटेल याने पोकळ घिस्सा डावावर उपमहाराष्ट्र केसरी पैलवान योगेश पवार याच्यावर मात केली. तो एक लाख 51 हजार रुपये व चांदीच्या गदेचा मानकरी ठरला.
लक्षवेधी ठरलेल्या एक लाख रुपये इनामाच्या कुस्तीत पै. जयदीप गायकवाड याने पै. अनिल ब्राह्मण याच्यावर डंकी डावावर मात केली. पै. भावेश सावंत याने पै. पप्पू काळे याला उलटी डावावर धोबीपछाड देत 75 हजार रुपये इनामाची कुस्ती जिंकली. पै. महावीर बनसोडे विरुद्ध पै. विशाल राजगे ही 51 हजार रुपये इनामाची कुस्ती बरोबरीत सोडविण्यात आली. तर पै. अक्षय तुपे याने पै. गणेश पाटोळे याला मच्छी गोटा डावावर पराभूत करुन 25 हजार इनाम जिंकले.
मलवडीचा सुपुत्र असलेल्या पै. जय कुंभार याने पै. गौरव रुपनवर याला तर पै. ओंकार निंबाळकर याने पै. अभिषेक सोडमिसे याला हात काढून घिस्सा डावावर चितपट करुन कुस्ती शौकिनांची वाहवा मिळवली. किरण जगदाळे यांनी चांदीची गदा दिली तर बाबू सावंत, अशोक बोराटे, दशरथ बोराटे, दादासाहेब काळे, श्री मल्हारी म्हाळसाकांत देवस्थान ट्रस्ट मलवडी, अतुल जगदाळे, भालचंद्र देवकर, रामचंद्र जगदाळे यांनी इनामासाठी देणग्या दिल्या. तर विजय जाधव यांनी चषक दिले. राजेंद्र जगदाळे व पै. अनिकेत कदम यांच्या बहारदार समालोचनाने आखाड्यास रंगत आली. पै. जय कुंभार यांचे वडील दीपक कुंभार यांनी मलवडीतील तरुणांच्या सहकार्याने भरवलेल्या या आखाड्यास पैलवानांसह कुस्ती शौकिनांचा उदंड प्रतिसाद लाभला.