नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर पक्षाचे जवळपास ४० आमदारांनी अजित पवार गटाला साथ दिली. दरम्यान, यावेळी देवळाई मतदार संघाच्या आमदार सरोज अहिरे या नेमक्या कोणत्या गटात जातील यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र आज अखेर सरोज अहिरे यांनी आपला निर्णय घेत अजित पवार गटाला आपला पाठिंबा दर्शवला आहे.
सरोज अहिरे यांनी नाशिक दौऱ्यावर असलेल्या अजित पवारांच्या स्वागताला उपस्थित राहत त्यांना पाठिंबा जाहीर केला. यावेळी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करत, “माझी तब्येत खराब होती, मात्र आता बरं वाटतं आहे. मी आज अजित पवारांच्या स्वागतासाठी बाहेर पडले आहे. याचा अर्थ असाच आहे की, मी माझ्या देवळाली मतदारसंघाच्या वतीने अजित पवारांना पाठिंबा जाहीर करत आहे. हॉस्पिटलमध्ये असताना माझी फोनद्वारे सर्वांशी चर्चा झाली आहे. सगळ्यांचं एकच मत होतं आणि ते म्हणजे आपण विकासाबरोबर जायला हवं.” असे म्हटले.
त्याच बरोबर “देवळाली मतदारसंघाचा पूर्ण विकास करण्यासाठी सत्तेबरोबर जा, असा सर्वांचा आग्रह होता. एकलहरा प्रकल्पासह इतर जनतेचे प्रश्न आणि राहिलेली कामं पुढील एक ते दीड वर्षात करण्यासाठी सत्तेबरोबर, अजित पवारांबरोबर राहा हा जनतेचा आग्रह आहे,” असे देखील सरोज अहिरे यांनी यावेळी सांगितले.
काही दिवसांपूर्वीच शरद पवार गटातील खासदार सुप्रिया सुळे सरोज अहिरे यांना भेटून गेल्या होत्या याविषयी बोलताना त्यांनी,“याआधी सुप्रिया सुळे मला भेटायला आल्या होत्या तेव्हा केवळ तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आल्या होत्या. तेव्हा आमची एक शब्दही राजकीय चर्चा झाली नव्हती.” “पत्रकारांनी मी आज इथं असण्याबाबत विचारलं. त्यामुळे उद्या पाठिंबा जाहीर करण्याऐवजी मी आजच जाहीर केला. मी शरद पवारांना नेहमी भेटत राहीन, चर्चा करत राहीन आणि मार्गदर्शन घेत राहीन. कारण राजकारण हा माझ्यासाठी वेगळा भाग आहे. शरद पवार माझ्यासाठी माझ्या वडिलांप्रमाणे आहेत. त्यांच्याबरोबर माझं भावनिक नातं आहे,” अशी भावना सरोज अहिरेंनी व्यक्त केली.