पिंपरी, दि. 6 – आईच्या दुधाला पर्याय असू शकत नाही. नुकत्याच जन्मलेल्या शिशुंपासून ते सहा-आठ महिन्यापर्यंतच्या बाळांना अनेकदा आपल्या जन्मदात्या आईचे दूध मिळू शकत नाही. अशा चिमुकल्यांना आईचे दूध देणारी यशोदा ह्युमन मिल्क बॅंक’ वरदान ठरत आहे. यामुळे नवजात शिशू व अतिदक्षता विभागातील (एनआयसीयू) बाळाच्या मृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे. पिंपरी चिंचवड शहरातील एकमेव अशी डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयातील “यशोदा’ ही ह्युमन मिल्क बॅंक हे दूध पुरविण्याचे काम करते.
2013 मध्ये सुरू झालेल्या या बॅंकेचा उपयोग प्रामुख्याने करोनाच्या काळात झाला. त्या वेळी बाळाची आणि आईची स्थिती कशी याचा काहीच अंदाज नसल्याने त्या वेळी दुधाला खूप मागणी होती. त्या वेळी या नवजात शिशूंसाठी वरदान ठरली. तरीही काही वेळा या बॅंकेत खडखडाट होत होता. तरीही पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्रभर दूध पुरविण्याचे काम या बॅंकेने केले. आता या बॅंकेत मोठ्या प्रमाणात दुधाची उपलब्धता आहे. गेल्या दहा वर्षांच्या कालावधीत दूध दात्या महिलांची संख्या वाढली आहे. तसेच या दुधालाही मागणी वाढत आहे. याबाबत जनजागृतीची तेवढीच गरज असल्याचे या बॅंकेच्या प्रमुख असलेल्या डॉ. शैलजा माने यांनी सांगितले.
नुकत्याच प्रसूत झालेल्या ज्या मातांना अतिरिक्त दूध येते, अशा मातांकडून या बॅंकेसाठी दूध घेण्यात येते. या दुधाला पाश्चराइज्ड, जंतूविरहीत केले जाते. त्यानंतर चाचणी करून हे दूध बालकांना दिले जाते. त्यामुळे बाळाची प्रतिकारशक्ती वाढते. आजार होत नाहीत; तसेच प्रगतीसाठी बाळाचा लवकर आणि चांगला प्रतिसादही मिळता.
‘ह्युमन मिल्क बॅंक’ म्हणजे काय
ज्या महिलांची प्रसूती मुदतपूर्व होते, त्यांच्या बालकांना ‘एनआयसीयू’ची गरज पडते. मुदतपूर्व प्रसूतीमुळे काही मातांना अपेक्षित पान्हा फुटत नाही. त्यांच्या बालकांना आईच्या दुधाची गरज पडते. त्या वेळी ‘ह्यूमन मिल्क बॅंक’ कामी येते. अशा बालकांना “एनआयसीयू’मध्ये ठेवण्यात येतो. त्या आईचे नैसर्गिक दूध देण्याचे काम ही मिल्क बॅंक करते.
‘ह्यूमन मिल्क बॅंक’ची गरज का
ज्या मातांना पुरेसे दूध येत नाही, त्या वेळी शिशूला मिळणे आवश्यक असते. मातेचे दूध हे नवजात शिशुंसाठी अमृत असते. हे अमृत मिळावे, यासाठी ह्युमन मिल्क बॅंकची गरज अधोरेखित करून 2013 मध्ये पिंपरी चिंचवडमध्ये ही मिल्क बॅंक सुरू करण्यात आली. त्या वेळी केवळ 222 मातांकडून दूध संकलित करता आले, यामुळे त्यावेळी 190 शिशुंची गरज भागली. गतवर्षी 1555 मातांकडून 7 लाख 58 हजार 475 एमएल दूध जमा झाले आहे. यामुळे 2 हजार 721 बालकांना दूध मिळू शकले.
या वर्षी केवळ जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत 335 मातांकडून 197140 एमएल दूध उपलब्ध झाले आहे. ज्यामुळे 467 शिशुंची भूक भागली. ज्यांना या दुधाची गरज आहे व ज्या मातांना दूध देण्याची इच्छा आहे त्यांनी आमच्या पर्यंत पोहचावे. तसेच या उपक्रमाची सर्वांना माहिती व्हावी, त्यांची अजूनही जनजागृती व्हावी, अशी इच्छा आहे.
– डॉ. शैलजा माने, प्रमुख, यशोदा ह्युमन मिल्क बॅंक, डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालय, पिंपरी.