नवी दिल्ली – दरवर्षीची रक्षाबंधनाची प्रथा पुढे नेत, जम्मू काश्मीरच्या उरी सेक्टरमधील चुरांडा गावातील स्थानिक महिलांनी नियंत्रण रेषेवरील जवानांना आज राख्या बांधून रक्षाबंधनाचा सण साजरा केला. त्यामुळे या ठिकाणी एक भावूक वातावरण निर्माण झालेले दिसले.
नियंत्रण रेषेवर दोन सैन्यांमध्ये वारंवार गोळीबार होत असताना, रक्षाबंधनाचा सण शत्रुत्व विसरून भावंडांचे प्रेम साजरे करण्याचा एक प्रसंग म्हणून संस्मरणीय ठरतो.यावेळी जवानांनी देखील आनंदाने हा सण साजरा केल्याचे पाहायला मिळाले.
या कार्यक्रमात सहभागी झालेल्या एका महिलेने सांगितले की, “सैनिकांप्रती बंधुप्रेमाची ही आमची अभिव्यक्ती आहे, जे नेहमीच आम्हाला मदत, समर्थन आणि संरक्षणासाठी तत्पर असतात. ते आमच्यासोबत ईद साजरी करतात. आम्ही त्यांच्या सेवांची कृतज्ञता यानिमीत्ताने व्यक्त करतो.”
या परिसरातील आजूबाजूच्या गावातील महिलांनीही सैनिकांना भावाच्या नात्याने राख्या बांधल्या.यावेळी सैनिकांनीही स्थानिक रहिवाशांचे कोणत्याही हानीपासून संरक्षण करण्याचे वचन दिले.