सातारा – सातारा शहरातील करोना प्रतिबंधाच्या प्रयत्नांना गुरुवारी जोरदार धक्का बसला. प्रतापगंज पेठेतील बाधित रुग्णाच्या संपर्कातील त्याची गेंडामाळ नाका येथे राहणारी मावशी आल्याने तिलाही करोनाची बाधा झाल्याचे अहवालावरून स्पष्ट झाले. त्यामुळे शहरातील कोविड बाधितांची संख्या आठ झाली आहे. नगरपालिकेच्या आरोग्य पथकाने तातडीने या भागाची निर्जंतुकीकरणाची मोहिम हाती घेतली.
जिल्हा रुग्णालयाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार वॉर्ड क्र. 10 मधील या बाधित महिलेला खावली येथील आरोग्य केंद्रात क्वारंटाइन करण्यात आले होते. कंटेनमेंट झोनमुळे लॉंकडाऊन अझिक कडक वाढण्याची शक्यता असून जीवनावश्यक सुविधांसाठी नागरिकांची कसरत सुरू आहे .करोना प्रतिबंधासाठी सामूहिक उपाययोजनां सुरू आहेत. मात्र, प्रतापगंज पेठेतील भाच्याच्या घरी त्याची गेंडामाळ नाका परिसरात राहणारी मावशी दशक्रिया विधीच्या निमित्ताने आल्याने संसर्गाचा फैलाव झाला. सातारा शहरात आता आठ रुग्ण बाधित निघाल्याने कंटेनमेंट झोनचा विळखा घट्ट झाला आहे.
आरोग्य पथक पुन्हा गेंडामाळ नाक्याकडे
या महिलेचा करोना अहवाल बाधित आल्याने सातारा शहरात पुन्हा खळबळ उडाली. गजानन महाराज मंदिर मठाकडे जाणारा रस्ता तातडीने प्रतिबंधित करण्यात आला. वॉर्ड क्र. 10 चे नगरसेवक मनोज शेंडे यांनी तातडीने उपमुख्याधिकारी संचित धुमाळ यांना कल्पना दिली. धुमाळ यांनी पथक सज्ज भरुन जंतूनाशक फवारणी व तपासणी मोहिम या दोन्ही गोष्टी एकाच वेळी सुरू केल्या. दोन पथके या भागासाठी तैनात करण्यात आली आहेत.