मुंबई -पुरुष क्रिकेटपटूंपाठोपाठ आता बीसीसीआयने केंद्रीय करार पद्धतीत महिला खेळाडूंच्या मानधनातही मोठी वाढ केली आहे. “अ’, “ब’ व “क’ अशा तीन श्रेणींमध्ये ही वाढ करण्यात आली असून या श्रेणीतील खेळाडूंनी अनुक्रमे 50, 30 व 10 लाख रुपये वार्षिक मिळणार आहेत.
महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर, स्मृती मानधना व दीप्ती शर्मा यांना “अ’ श्रेणीत कायम ठेवले गेले आहे. या श्रेणीतील पाच ऐवजी आता वरील तीनच खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे. पूनम यादव व राजेश्वरी गायकवाड यांना मात्र, या श्रेणीत स्थान देण्यात आलेले नाही. राजेश्वरीने स्वतःच निर्णय घेत करार नाकारला आहे. पूनमला ब श्रेणीत सामावून घेण्यात आले आहे. “ब’ श्रेणीत रेणुका सिंग ठाकूर, जेमिमा रॉड्रिग्ज, शेफाली वर्मा, रिचा घोष व राजेश्वरी गायकवाड यांचा समावेश आहे.
जेमिमा व रिचा यांना क श्रेणीतून बढती देताना ब श्रेणीत घेण्यात आले आहे. “क’ श्रेणीमध्ये मेघना सिंग, देविका वैद्य, शब्बिनेनी मेघना, अंजली सरवानी, पूजा वस्त्रकर, स्नेह राणा, राधा यादव, हरलीन देओल व यास्तिका भाटिया यांच्यासह 9 खेळाडूंचा समावेश आहे. या खेळाडूंमधील पूजा हिची मात्र घसरण झाली आहे. तिच्या सुमार कामगिरीमुळे तिचे ब श्रेणीतील स्थान गेले असून तिला क श्रेणी देण्यात आली आहे.
समान कराराची घोषणा हवेतच
बीसीसीआयच्या अध्यक्षपदी सौरव गांगुली असताना त्यांनी पुरुष क्रिकेटपटूंप्रमाणे महिला क्रिकेटपटूंनाही समान करार देण्याची घोषणा केली होती. तसेच सध्याचे अध्यक्ष रॉजर बिन्नी यांनीही त्याबाबत संकेत दिले होते. मात्र, प्रत्यक्ष करार देताना रकमेत वाढ जरी झाली असली तरी पुरुष व महिला क्रिकेटपटूंच्या करारात कोणतीही समानता बीसीसीआयने आणलेली नसून ही घोषणा केवळ हवेतच विरल्याचे समोर आले आहे.
शिखा व तानियाला डावलले
दक्षिण आफ्रिकेत झालेल्या टी-20 विश्वकरंडक स्पर्धेत थाटात पुनरागमन साजरे केलेली वेगवान गोलंदाज शिखा पांडे व यष्टीरक्षक तानिया भाटिया यांना मात्र करारातून डावलण्यात आले आहे.