पुणे – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पाडवा मेळाव्यात मशिदीवरील भोंग्यांवरून घेतलेल्या भूमिकेनंतर मनसेतील मतभेद चव्हाट्यावर आले होते. पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी राज ठाकरेंच्या आदेशाला बाजुला ठेवत वेगळी भूमिका घेतली होती. त्यामुळे मोरे यांना आज मनसे शहराध्यक्ष पदावरून हटविण्यात आलं. या सर्व घटनेनंतर वसंत मोरे आता काय भूमिका घेणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.
वसंत मोरे यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून पक्षात येण्यासाठी जाहीर आमंत्रण देण्यात आलं आहे. पुणे राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी मोरे यांना पक्षात येण्याचं आमंत्रण दिलं आहे. एक व्हिडीओ शेअर करून जगताप यांनी मोरेंना सोबत काम करूया असं म्हटलं आहे.
शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये जगताप म्हणाले की, मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ज्या पद्धतीने आपले विचार मांडले ते विचार सामाजिक जिवनात काम करणाऱ्या अनेकांना न पटणारे आहेत. ज्यांचा प्राधान्यक्रम जातधर्माच्या पलिकडे जाऊन देश, राज्य आणि शहर असा आहे, त्या सर्व कार्यकर्त्यांना मी आवाहन करतो की, त्यांनी राष्ट्रवादी पक्षात यावं.
माझे मित्र वसंतराव मोरे यांना मी आवाहन करतो की, त्यांनी राष्ट्रवादी पक्षात यावं. राष्ट्रवादीमध्ये त्यांचा योग्य तो मानसन्मान करण्यात येईल, असं आश्वासनही जगताप यांनी दिलं.