हडपसर (विवेकानंद काटमोरे)- महापालिकेने केलेल्या प्रभाग रचनेवर आलेल्या एकूण 3 हजार 596 हरकती-सूचनांमध्ये सर्वाधिक 1 हजार 34 हरकती हडपसर विधानसभा मतदार संघातून प्रभाग क्र. 22,23,25,26, 41, 42, 43, 44, 45, 46 या विषयी वानवडी-रामटेकडी क्षेत्रीय कार्यालयाकडे आलेल्या आहेत. यावर राज्य निवडणूक आयोगाने नेमलेल्या अधिकाऱ्याकडून हडपसर मतदार संघातील प्रभागांविषयीच्या हरकतींवर शुक्रवारी (दि. 25) सुनावणी होणार जाणार असून सुनावणीनंतर अधिकाऱ्यांनी केलेल्या शिफारशींचे विवरणपत्र राज्य निवडणूक आयोगाला दि. 2 मार्चला सादर करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रभागाचा अंतिम आराखडा जाहीर होणार असल्याने सर्वाधिक हरकती-सूचना आलेल्या हडपसर प्रारूप प्रभागामध्ये काही बदल होणार का? अशी चर्चा असून याकडे आजी-माजींसह इच्छुक उमेदवारांचे लक्ष लागले आहे.
महापालिका निवडणुकीसाठीची प्रभाग रचना दि. 1 फेब्रुवारीला जाहीर करण्यात आल्यानंतर हडपसर मतदार संघातून मोठी नाराजी व्यक्त करण्यात येत होती. यामुळे येथून सर्वाधिक हरकती-सूचना दाखल झाल्या. हडपसर विधानसभा मतदार संघातून शेवटच्या दिवशी सर्वाधिक हरकती दाखल झाल्या, यामध्ये राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनींच्या हरकती-सूचना सर्वाधिक होत्या. नैसर्गिक हद्द लक्षात न घेता प्रभाग रचना करण्यात आली आहे, लोकसंख्येच्या निकषाचे पालन झालेले नाही. प्रभाग रचना करताना समानता दिसत नाही, सोसायट्योच भाग तोडले आहेत, याबाबतचे मुद्दे नोंदविण्यात आले.
हडपसरसह सर्व हरकती-सूचना दि.16 फेब्रुवारीला राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आल्या आहेत. यावर राज्य निवडणूक आयोगाने नेमणूक केलेल्या अधिकाऱ्यांकडून शुक्रवारी (दि. 25) सुनावणी घेतली जाणार आहे. त्यानंतर अधिकाऱ्यांकडून शिफारशी राज्य निवडणूक आयोगाला दि. 2 मार्चला सादर केल्या जातील, त्यानंतर सर्वच प्रभागाचा अंतिम आराखडा जाहीर केला जाणार आहे. यामुळे प्रभाग बदलणार की तसाच राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रभाग रंचना अंतिम झाल्यानंतर आरक्षणाबाबतची प्रक्रिया सुरू होईल.