नवी दिल्ली : देशातील करोनाची दुसरी लाट सध्या ओसरली आहे. यासाठी लसीकरणावर मोठ्या प्रमाणात भर देण्यात येत आहे. देशात लसीकरण मोहीम सुरु असून लवकरच १२ ते १८ वर्षातील मुलांसाठी लस उपलब्ध होणार आहे. भारतीय औषध कंपनी झायडस कॅडिलाकडून ही लस तयार करण्यात आली आहे. केंद्राने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात ही माहिती दिली आहे.
झायडस कॅडिलाच्या लसीची चाचणी पूर्ण झाली असून मान्यता मिळाल्यानंतर लसीकरणास सुरुवात होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. महिन्याच्या सुरूवातीला लसीकरणाच्या धोरणात बदल करण्यात आल्यानंतर लसीकरण मोहिमेबद्दल सर्वोच्च न्यायालयाने काही प्रश्न उपस्थित केले होते. त्यांना उत्तर देताना सर्वोच्च न्यायालयाने वर्षअखेरपर्यंत देशातील १८ वर्षापुढील सर्व नागरिकांचे लसीकरण करण्याची योजना असल्याची माहिती दिली.
१८ वर्षांपुढील नागरिकांची एकूण लोकसंख्या ९३ ते ९४ कोटी असून त्यासाठी एकूण लसींच्या १८६ कोटी डोसची गरज असल्याचे केंद्र सरकारने सांगितले आहे. सर्व वयोगटासाठी केंद्रावर पोहोचल्यानंतर लस देण्याची सुविधा निर्माण करण्यात आले असून यापुढे ऑनलाइन नोंदणी बंधनकारक नसल्याचेही सर्वोच्च न्यायालयाने न्यायालयात सांगितले आहे.
लसीकरण धोरण स्थिर असल्याचे सांगताना केंद्राने नव्या धोरणानुसार सोमवारपासून १८ वर्षांपुढील सर्वांसाठी लसीचे डोस मोफत असल्याची माहिती दिली आहे. दुसरीकडे केंद्राने राज्यांना बनावट लसीकरण शिबिरांची चौकशी करुन कडक कारवाई करण्याचा आदेश दिला आहे.
नरेंद्र मोदी यांनी शनिवारी उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसमवेत लसीकरण मोहिमेच्या प्रगतीचा आढावा घेतला आणि त्यानंतर देशात गेल्या सहा दिवसांमध्ये ३.७७ कोटींहून अधिक जणांचे लसीकरण करण्यात आल्याचे सरकारच्या वतीने जाहीर करण्यात आले. देशातील १२८ जिल्ह्यांमध्ये ५० टक्क्यांहून अधिक लोकांचे (४५ वर्षांवरील) लसीकरण करण्यात आले असून १६ जिल्ह्यांमध्ये याच वयोगटातील ९० टक्क्यांहून अधिक जणांचे लसीकरण करण्यात आले असल्याचे नमूद करण्यात आले.