नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) उद्या 17 सप्टेंबर रोजी ‘विश्वकर्मा जयंती’ निमित्त हस्तकला कारागीर आणि पारंपारिक कौशल्यांमध्ये कार्यरत असलेल्यांच्या व्यवसायिकांच्या मदतीसाठी “पीएम विश्वकर्मा” (PM Vishwakarma scheme) ही नवीन योजना सुरू करणार आहेत. या क्षेत्रातील कारागिरांना आर्थिक मदत आणि प्रशिक्षण देऊन त्यांच्या व्यवसायाच्या उन्नतीला प्रोत्साहन दिले जाणार आहे.
13,000 कोटी रुपयांचा निधी –
पंतप्रधान मोदींनी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात या योजनेचे आश्वासन दिले होते. या योजनेला केंद्र सरकार 13,000 कोटी रुपयांचा निधी टप्प्याटप्याने उपलब्ध करून देणार आहे. योजनेअंतर्गत, संभाव्य लाभार्थ्यांची बायोमेट्रिक-आधारित पीएम विश्वकर्मा पोर्टल (PM Vishwakarma Portal) वर सामान्य सेवा केंद्रांद्वारे विनामूल्य नोंदणी केली जाईल. 17 सप्टेंबर रोजी पंतप्रधानांचा 73 वा वाढदिवस देखील आहे.
15,000 चे टूलकिट प्रोत्साहन
योजनेच्या लाभार्थ्यांना पीएम विश्वकर्मा प्रमाणपत्र आणि ओळखपत्र, मूलभूत आणि प्रगत प्रशिक्षणाचा समावेश असलेले कौशल्य अपग्रेडेशन, रु. 15,000 चे टूलकिट प्रोत्साहन, सवलतीच्या दरातील कर्ज अशा सुविधा दिल्या जाणार आहेत. “गुरु-शिष्य परंपरा” आणि पारंपारिक कौशल्यांचा पाया मजबूत करणे हे या योजनेचे उद्दीष्ठ आहे.
अठरा पारंपारिक हस्तकला व्यवसाय समाविष्ट
योजनेत अठरा पारंपारिक हस्तकला व्यवसाय समाविष्ट करण्यात आले असून त्यात सुतार, बोट बनवणारे, चिलखत, लोहार, हातोडा आणि अन्य उपकरणे तयार करणारे, कुलूप तयार करणारे, सोनार, कुंभार, शिल्पकार, दगड तोडणारे, मोची, गवंडी, टोपली/चटई/झाडू बनवणारे आणि कोरीव काम करणारे, बाहुली आणि खेळणी बनवणारे, माला बनवणारे, शिंपी, आणि मासेमारीचे जाळे तयार करणारे अशा हस्तकला व्यावसायिकांचा समावेश आहे.