मुंबई – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवण्यास इच्छुक नाहीत, असे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या एका मंत्र्याने आज नमूद केले. काल सोमवारी पवार यांनी पक्षाच्या मंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली होती. त्यावेळी हा मुद्दा चर्चेला आला होता.त्यावेळी पवार हे उत्सुक नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
या बैठकीला उपस्थित राहिलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या एका मंत्र्याने सांगितले की, आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांनी रविवारी पवार यांची भेट घेतली आणि 18 जुलै रोजी होणाऱ्या भारताच्या राष्ट्रपतींच्या निवडणुकीसाठी पवारांना पाठिंबा देऊ केला.
गेल्या आठवड्यात कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे राज्यसभा निवडणुकीच्या संदर्भात मुंबईत असताना त्यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षांचे संयुक्त उमेदवार म्हणून पवार यांच्या नावाची शिफारस केली आहे. पवारांच्या उमेदवारीबाबत कॉंग्रेसने ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल कॉंग्रेसशी सल्लामसलतही केली असल्याचे खरगे म्हणाले.
पण, मला वाटत नाही की ते ही निवडणूक लढवायला उत्सुक आहेत. साहेब हे लोकांचे नेते आहेत त्यांना लोकांना भेटायला आवडते. ते स्वतःला राष्ट्रपती भवनापुरते मर्यादित ठेवणार नाहीत,राष्ट्रवादीच्या मंत्र्याने सांगितले. 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधकांना एकत्र आणण्याच्या प्रयत्नात पवार व्यस्त आहेत, असेही ते म्हणाले.