कोंढवा, दि.12 (प्रतिनिधी) -कोंढवा खुर्द व कोंढवा बुद्रुक परीसरात रविवारी झालेल्या मुसळधार पावसाचे पाणी अनेकांच्या घरात शिरल्याने अनेकांचे संसारोपयोगी साहित्य वाहून गेले तर अनेक साहित्याचे नुकसान झाले. आज, अनेक ठिकाणी पाणी उपसण्याचे काम सुरू होते. कोंढवा परिसरात रविवारी मुसळधार पाऊस झाला. आज दुसऱ्या दिवशी अनेक ठिकाणी घरातील तसेच सोसायट्यांत पाणी उपसण्याचे काम सुरू होते.
कोंढव्यातील मिठानगर, भाग्योदयनगर, गावठाण, कोंढवा बुद्रुक परिसरात पावसाच्या पाण्यासह ड्रेनेजचे पाणीही वाहत असल्याने नारिकांचे मोठे हाल झाले. मिठानगर, शिवनेरीनगर, भाग्योदयनगर हे भाग टेकडावर आहेत. याभागातील पावसाचे पाणी रस्त्यावरुन सखल कोंढवा गावठाण भागात साचल्याने कोंढवा मुख्य रस्त्यावरून आजही मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते. वानवडीतील विकासनगर येथे भिंत कोसळल्याने त्याचा राडारोडा हटविण्याचे काम सुरू करण्यात आले. आजही खडीमशीन ते उंड्री चौकापर्यंत अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचले असल्याने वाहतूक कोंडी कायम होती.
नाले, ड्रेनेज लाइन, पावसाळी लाइन भरून वाहात आहेत. पालिका प्रशासनाला पाणी तुंबण्याची ठिकाणे व पाण्याचा निचरा होत नसलेल्या ठिकाणची माहिती दिली असून तातडीेन काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
– हाजी गफुर पठाण,माजी नगरसेवक
कमी व्यासाची ड्रेनेज लाइन, पावसाळी लाइनचे चेंबर यांची संख्या रस्ता बनविताना कमी ठेवण्यात आली. याशिवाय नाल्यांवर झालेली अतिक्रमणे तसेच पाणी वाहून जाण्यासाठी जागाच ठेवलेली नसल्याने कोंढवा परिसरात पूर परिस्थिती निर्माण झाली. याचाच फटका सर्वांना बसला. – देवदास लोणकर, कॉंग्रेस नेते