प्रक्षाळ पूजनाने झाली संत सोपानदेव संजीवन समाधी सोहळ्याची सांगता.
सासवड-
जयजयकारे टाळी पिटली सकळा । घातियेली शिळा समाधीसी ।।1।।
निवृत्ती मुक्ताईने घतीयेली घोन । करितो समाधान पांडुरंग ।।2।।
सोपान वटेश्वर सुखधामी शेजा । करिताती पूजा समाधीची ।।3।।
खेद दुःख झाले अवघ्या साधुजनां । केली प्रदक्षिणा समाधीसी ।।4।।
निवृत्ती मुक्ताईने वंदिली समाधी । देहभान शुद्ध हरपली ।।5।।
नामा म्हणे देवा उठा अवघेंजण । करू आचमन भोगवती ।।6।।
या संत नामदेव महाराज यांनी रचलेल्या संत सोपानदेव समाधी वर्णनाचा अभंग म्हणत राज्यभरातील वारकऱ्यांनी गरम पाण्याने समाधीस प्रक्षाळ पूजा केली. टाळ-मृदंगाचा गजर करीत आणि मुखाने पुंडलिक वरदे, हरी विठ्ठलचा जयघोष करीत समाधी स्थळाचा निरोप घेतला आणि सुमारे सात दिवसांपासून सुरू असलेल्या समाधी सोहळ्याची सांगता करण्यात आली.
श्रीक्षेत्र सासवड (ता. पुरंदर) येथे संत सोपानदेव महाराज संजीवन समाधी सोहळ्याची नुकतीच सांगता करण्यात आली. बुधवार (दि. 19) पासून हा सोहळा सुरू होता. यामध्ये पहाटे काकडा आरती, सकाळी कीर्तन, दुपारी प्रवचन, हरिपाठ, रात्री पुन्हा कीर्तन, त्यानंतर जागर असे कार्यक्रम सुरू होते. बुधवारी (दि. 25) पहाटे काकडा आरती झाल्यावर सकाळी 9 पासून समाधीस अभिषेक घालण्यात आले. त्यानंतर सकाळी 11ः30 ते 12 या वेळात संत सोपानदेव समाधीस गरम पाण्याने प्रक्षाळ पूजा घालण्यात आली. यावेळी राज्यभरातून आलेल्या वारकऱ्यांनी समाधीस गरम पाण्याने अभिषेक घालून महापूजा केली.
यावेळी पुरंदरचे आमदार संजय जगताप आणि त्यांच्या पत्नी राजवर्धिनी जगताप यांनी मंदिरात येऊन संत सोपानदेव समाधीची विधिवत पूजा केली आणि पुष्पहार अर्पण केले. या प्रसंगी नगरसेवक नंदकुमार जगताप, हभप म्हस्कूमहाराज कामठे, मुकुंद जगताप, विश्वजित आनंदे, सयाजी हिवरकर, मंदिराचे पुजारी गोविंद जोशी उपस्थित होते. रात्री 8 ते 10 या वेळात संत नामदेव महाराजांचे 17 वे वंशज हभप ज्ञानेश्वर महाराज नामदास यांचे कीर्तन झाले. त्यानंतर रात्री रोकडोबादादा दिंडीचा जागर झाला. आणि त्यानंतर संत सोपानदेव समाधी सोहळ्याची उत्साहात सांगता करण्यात आली.