वाघोली (प्रतिनिधी) : कोरोनाचा वेगाने होणारा संसर्ग रोखण्यासाठी वाघोली ग्रामपंचायतीचे संपूर्ण कार्यक्षेत्र कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात आले आहे. हवेली उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर यांनी काढलेला आदेश वाघोलीसह हवेली तालुक्यातील कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव असलेल्या २० ग्रामपंचायतींच्या संपूर्ण कार्यक्षेत्रासाठी ८ जुलै रात्री १२ पासून लागू होणार आहे.
कंटेनमेंट झोन मधील सर्व प्रमुख रस्ते बंद करून सदर परिसराच्या हद्दीमध्ये पुढील आदेशापर्यंत नागरिकांना प्रवेशबंदी व घरातून बाहेर पडण्यास बंदी करण्यात आली आहे. तर कंटेनमेंट झोनमध्ये सकाळी १० ते दुपारी २ या कालावधीतच दुध, भाजीपाला, फळे या व इतर जीवनावश्यक व अत्यावश्यक सोयीसुविधा सुरु राहतील.
कोरोनाचा वेगाने होणारा प्रसार रोखण्यासाठी व संभाव्य सामुदायिक प्रसार टाळण्यासाठी नागरिकांच्या हालचालींवर, बाहेर फिरण्यावर मर्यादा आणण्याकरिता कंटेनमेंट झोन घोषित करून वाढणाऱ्या कोरोनाच्या प्रसारास प्रतिबंध करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची आवश्यकता निर्माण झाल्याने हवेलीचे उपविभागीय अधिकारी यांनी हवेली तालुक्यातील वाघोली, मांजरी खुर्द यांच्यासह २० ग्रामपंचायतीचे संपूर्ण कार्यक्षेत्र कंटेनमेंट झोन जाहीर केले आहे.
सदरचा आदेश ८ जुलै रात्री १२ पासून लागू होणार आहे. आदेशान्वये यागावांच्या सीमा व सर्व प्रमुख रस्ते बंद करण्यात येत असून संबंधित पोलीस प्रमुख हद्दी सील करतील. सदर परिसराच्या हद्दीमध्ये पुढील आदेशापर्यंत नागरिकांना प्रवेशबंदी व घरातून बाहेर पडण्यास बंदी करण्यात आली आहे. कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काम करणारे कर्मचारी, पोलीस कर्मचारी व वाहने, अत्यावशक सेवा देणाऱ्या यंत्रणांना तसेच अत्यावश्यक सेवा व वस्तूंचा पुरवठा करणारी वहातुक आदेशातून वगळण्यात आली आहे.
६५ वर्षावरील व्यक्ती, गरोदर महिला व १० वर्षापेक्षा कमी वयोगटातील मुले यांना अत्यावश्यक कारणाशिवाय बाहेर जाता येणार नाही. बँका सकाळी १० ते दुपारी २ या कालावधीतच सुरु राहतील. प्रतिबंधित क्षेत्रात सकाळी १० ते दुपारी २ या कालावधीतच दुध, भाजीपाला, फळे या व इतर जीवनावश्यक व अत्यावश्यक सोयीसुविधा सुरु राहतील. १ किंवा २ रुग्णांचा आढळ झाल्यास या परिसरातील उद्योग व औद्योगिक अस्थापना सुरु राहणार असून रुग्णाच्या संपर्कात आलेल्या कर्मचाऱ्यांचे आरोग्य तपासणी करण्यात येईल. उद्योग व आस्थापना बंद होणार नाही.
सदरचा आदेश पुढील आदेशापर्यंत लागू राहील. तद्नंतर परिस्थितीचा आढावा घेवून जनतेच्या व्यापक हिताचा विचार करून उचित निर्णय घेण्यात येईल असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
नागरिकांनी केले स्वागत वाघोली ग्रामपंचायतीचे संपूर्ण कार्यक्षेत्र कंटेनमेंट झोन जाहीर झाल्यानंतर वाघोलीतील बहुसंख्य नागरिकांनी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या आदेशाचे स्वागत केले आहे. वाघोलीतील सामाजिक संसर्ग थांबविण्यासाठी नागरिकच वाघोलीत लॉकडाऊन करण्याची मागणी करीत होते. काही दुकानदार, व्यापारी नाराज होणार असले तरी बहुतेक नागरिक आदेशाचे स्वागत करीत आहे.