मॉस्को – युरोप आणि आशियातील सर्वात उंच कामचातका द्विपसमूहातील ज्वालामुखीचा उद्रेक झाला आहे. या ज्वालामुखीमधून मोठ्या प्रमाणात राख आणि तप्त लाव्हा फेकला जाऊ लागला आहे. ज्वालामुखीच्या मुखातून बाहेर पडणारे पेटलेले दगड आणि लाव्हा 13 किलोमीटर दूरपर्यंत जाते आहे. त्यामुळे कामचातका येथील प्रशासनाने स्थानिक नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला असून खबरदारीचा उपाय म्हणून शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत.
आतापर्यंत या ज्वालामुखीमुळे कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. कामचातका आणि क्लुची ही गावे पूर्णपणे बंद ठेवण्यात आली असून येथील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे. या दोन्ही गावांची लोकसंख्या प्रत्येकी 5 हजार इतकी आहे.
अंदाजे 4,650 मीटर उंचीवरील हा ज्वालामुखी अलीकडे सक्रिय झाला आहे आणि जूनमध्ये या ज्वालामुखीतून लाव्हा बाहेर पडायला सुरुवात झाली होती. मॉस्कोच्या पूर्वेस सुमारे 6,700 किलोमीटर पॅसिफिक महासागरात पसरलेला कामचटका द्वीपकल्प हा सुप्त ज्वालामुखी, उष्ण पाण्याचे भू-औष्णिक झरे यांच्यासाठी प्रसिद्ध आहे. या ज्वालामुखीचा पहिला उद्रेक 1697 मध्ये नोंदवला गेला आणि तेव्हापासून तो सक्रिय आहे.