विजय परीट : गृहभेटी व लाभार्थी मेळावा घेणार
रेडा- आवास दिनानिमित्त दि. 20 नोव्हेंबर रोजी अधिकारी, कर्मचाऱ्यांचा राज्यस्तरावर गौरव करण्यात येणार आहे. यानिमित्त इंदापूर तालुक्यातील पंचायत समितीच्या वतीने लाभार्थ्यांचा आवास सप्ताह घेण्यात येणार आहे. यामध्ये तब्बल 14 अधिकारी प्रत्येक पंचायत समिती गणात काम करणार आहेत. रमाई शबरी,पारधी व शबरी आवास योजनेअंतर्गत ग्रामपंचायतीकडे लाभार्थ्यांची बांधकाम प्रगतीत आहे. अपूर्ण घरकूल पूर्ण करण्याकरिता लाभार्थी मेळाव्यास मार्गदर्शन करण्यात येणार आहे. अपूर्ण घरकुलधारकास थेट घर भेटी देऊन घरकूल पूर्ण करण्यासाठी सहकार्य करण्यात येईल, अशी माहिती इंदापूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी विजय परीट यांनी दिली.
लाभार्थीच्या आवास सप्ताहकरिता सर्व पंचायत समिती गणांमध्ये अधिकारी नियुक्त केले आहेत. यामध्ये सणसर- किरण मोरे, भिगवण- रामचंद्र गवंड, वडापुरी- वाईकर,वालचंदनगर – सचिन धापटे, कळस -सोमनाथ लेंगरे, काटी- तेजस जगताप, लाखेवाडी- कबीर कदम, शेटफळगडे- महादेव भंडलकर, बावडा- हनुमंत बागल, पळसदेव- राजेंद्र काळे, लासुर्णे- मोहन पवार, बिजवडी- दिलीप जगताप, निमगाव केतकी राजेंद्र बामणे, निमसाखर- राठोड, या 14 अधिकाऱ्यांची पंचायत समिती गणांमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. सर्वांसाठी घरे देणे हे शासनाचे महत्त्वपूर्ण धोरण आहे. राज्यात केंद्रपुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कृत रमाई शबरी आदिम पारधी आवास योजना अभियान स्वरुपात राबविण्यात येत आहेत.
दि. 18 ते 22 नोव्हेंबर या कालावधीत सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. दि. 20 रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत ग्रामविकास भवन खारघर नवी मुंबई येथे उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचारी, अधिकारी, ग्रामपंचायतींचा गौरव सोहळा होणार आहे. यासंदर्भात काही अडचणी असल्यास थेट पंचायत समिती कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही आवाहन परीट यांनी केले.