पुणे – व्हिजन स्पोर्ट्स सेंटर तर्फे आयोजित दुसर्या ‘व्हिजन प्रिमिअर लीग’ अजिंक्यपद २५-२५ षटकांच्या क्रिकेट स्पर्धेत साई वाळुंज आणि निलय जोशी यांच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर लेपडर्स इलेव्हन संघाने लायन्स् इलेव्हन संघाचा सहज पराभव करत स्पर्धेचे विजेतेपद संपादन केले.
व्हिजन क्रिकेट अॅकॅडमी मैदान, सनसिटी रोड येथे झालेल्या या स्पर्धेचा अंतिम सामना जेमतेम २० षटकांचा आणि कमी धावांचा झाला. पहिल्यांदा फलंदाजीस आलेल्या लायन्स् इलेव्हन संघाला अंतिम सामन्याच्या दबावाचा सामना करता आला नाही. लेपर्ड्स इलेव्हनचे फिरकीपटू साई वाळुंज आणि निलय जोशी यांच्या जाळ्यात लायन्स्चे फलंदाज अडकले गेले. साई याने १० धावांमध्ये ५ गडी बाद केले तर, निलय याने ८ धावात ४ गडी बाद करून संघाच्या डावाचेे कंबरडे मोडले. रणवीर मते हा लायन्स्चा एकमेव फलंदाज दुहेरी धावसंख्या करू शकला. लायन्स्चा डाव ४० धावांवर गडगडला. अदवय सोनावणे (नाबाद १७ धावा) आणि दुर्गेश सहानी (नाबाद १३ धावा) यांनी लायन्स् संघाला कोणतीही जिंकायची संधी न देता आवश्यक लक्ष्य सहज गाठले आणि लेपडर्स संघाने चौथ्या षटकामध्येच विजेतेपदाला गवसणी घातली.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण स्पर्धेचे संचालक आणि संयोजक गणेश जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. विजेत्या लेपर्ड्स इलेव्हन आणि उपविजेत्या लायन्स् इलेव्हन संघाला करंडक आणि मेडल्स् देण्यात आली. वैयक्तिक पारितोषिकांमध्ये स्पर्धेचा सर्वोत्तम खेळाडूचा मान आशिष गुप्ता याला देण्यात आला. सर्वोत्तम फलंदाज हा मान अदवय सोनावणे तर, सर्वोत्तम गोलंदाज हा मान निलय जोशी याला देण्यात आला.
अंतिम सामन्याचा संक्षिप्त निकालः
लायन्स् इलेव्हन : १५.४ षटकात १० गडी बाद ४० धावा (रणवीर मते १३, मोहीत देसाई ५, साई वाळुंज ५-१०, निलय जोशी ४-८) पराभूत वि. लेपर्ड्स इलेव्हनः ३.५ षटकात बिनबाद ४१ धावा (अदवय सोनावणे नाबाद १७, दुर्गेश सहानी नाबाद १३); सामनावीरः साई वाळुंज;
वैयक्तिक पारितोषिके : स्पर्धेचा सर्वोत्तम खेळाडूः आशिष गुप्ता (टायगर्स इलेव्हन); सर्वोत्तम फलंदाजः अदवय सोनावणे (१८६ धावा, लेपर्ड्स इलेव्हन); सर्वोत्तम गोलंदाजः निलय जोशी (१५ विकेट, लेपर्ड्स इलेव्हन).