राजुरी, (वार्ताहर) – अकोले येथील विनोद सालकर ने शिरापूरच्या शिवाजी उचळेचा धोबीपछाडाच्या डावाने पराभव करीत राजुरी केसरी ही चांदीची गदा पटकावली. राजुरी (ता. जुन्नर) येथील खंडेराय भैरवनाथ यात्रा उत्साहात संपन्न झाली. यात्रा उत्सवाच्या निमित्ताने श्रींची महापूजा व अभिषेक, मांडव डहाळे व काठी पालखी, रात्री नऊ वाजता शोभेचे दारूकाम व त्यानंतर शकुंतला नगरकर लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम पार पडला.
यात्रेनिमित्त झालेल्या कुस्त्यांच्या जंगी आखाड्यात अंतिम कुस्तीत सालकर विजयी ठरला. यावेळी 200 मल्लांनी मैदानात नोंदविला. दुसर्या क्रमांकाच्या ढाली साठी झालेल्या कुस्ती मध्ये पैलवान आदेश रायकर व मच्छिंद्र चोरे यांच्यात झाली. यामध्ये विजयी झालेल्या आदेश रायकर यास रोख रक्कम व मानाची ढाल देण्यात आली.
तर दोन चांदीच्या कड्यांसाठी झालेल्या कुस्तीमध्ये भरत फुलमाळी, व अक्षय खंडागळे याने बाजी मारली तर निलेश उचाळे याने चांदीच्या ब्रेस लेटसाठी झालेल्या कुस्तीत बाजी मारली. आखाड्यात विजयी मल्लांना तालुक्याचे आमदार अतुल बेनके, माजी आमदार शरद सोनवणे,
माजी सभापती दीपक औटी, विघ्नहर साखर कारखान्याचे संचालक कुंडलिक हाडवळे, सरपंच प्रिया हाडवळे, उपसरपंच माऊली शेळके, एम. डी. घंगाळे आदी मान्यवरांच्या उपस्थित बक्षिसे देण्यात आली. पंच म्हणून प्रा. प्रकाश जोंधळे व बाळासाहेब कुर्हाडे यांनी काम पाहिले.
महिलांच्या कुस्त्या ठरल्या लक्षवेधी
कुस्ती आखाड्यात सायली कुरकुटे, स्वरा गाडे, तन्वी रोकडे, शिवकन्या भडांगे, मोनिका चव्हाण, संजीवनी चव्हान, विशाखा चव्हाण या मुलींच्या कुस्त्या आकर्षक व लक्षवेधी ठरल्या.